नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
निफाड (Niphad) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधील कॅश डिपॉझिट मशीनमध्ये (सीडीएम) ५०० रुपये दराच्या तब्बल ४७ बनावट नोटा जमा करणाऱ्या संशयिताला नाशिक शहर पोलिसांच्या (Nashik City Police) गुंडाविरोधी पथकाने अटक केली. संदीप रंगनाथ निकम (४२, रा. माधव पार्क, जेलरोड, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
३ नोव्हेंबर २०२६ रोजी एका अनोळखी व्यक्तीने निफाड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीडीएम मशीनमध्ये ५०० रुपये दराच्या एकूण ४७ बनावट नोटा जमा केल्या होत्या. या नोटा बनावट असल्याची माहिती असूनही त्या खऱ्या असल्याचे भासवून बँकेची दिशाभूल करत आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी बँकेचे उपव्यवस्थापक हेमंत अशोकराव पाटील यांच्या फिर्यादीवरून निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित नाशिक शहरात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती गुंडाविरोधी पथकातील पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना मिळाली.
त्यानुसार पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांनी वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आंबेडकरवाडीच्या मागे, उत्तरा नगर परिसरात नाशिक-पुणे रोडवर सापळा रचला. या कारवाईत संदीप निकम याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी त्याला निफाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांनी केली.




