Thursday, November 26, 2026
HomeनाशिकDattatray Bharane : २० लाख शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान; कृषीमंत्री भरणेंची मोठी...

Dattatray Bharane : २० लाख शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान; कृषीमंत्री भरणेंची मोठी घोषणा

नाशिक तालुक्याचाही दुष्काळी यादीत समावेश करणार

नाशिक | Nashik

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून, नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १४ तालुक्यांसोबतच आता उर्वरित नाशिक तालुक्याचाही दुष्काळी यादीत समावेश केला जाईल, अशी महत्त्वाची ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना (Farmer) लवकरच प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मोठी घोषणाही केली.

- Advertisement -

दुष्काळ निवारण आणि शेतकऱ्यांना मदत

राज्यात दुष्काळ जाहीर झाला असून कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागामार्फत पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही, त्यांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करावी; त्यांनाही लवकरच मदत दिली जाईल, असे आवाहन भरणे यांनी केले. याशिवाय केंद्राकडे सुधारित अहवाल पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चारा व वीज नियोजनाबाबत स्पष्टोक्ती

पुढील सहा महिने महत्त्वाचे असल्याने पशुधनाला चारा कमी पडू नये, यासाठी मोफत बियाणे आणि चाऱ्याचे योग्य नियोजन केले जात आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यासंदर्भात योग्य नियोजन केले असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, शेतकऱ्यांना २४ तास वीज देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत, सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी महावितरणने घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लवकरात लवकर दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या टीकेवर बोलताना भरणे यांनी सुनेत्रा पवार यांची पाठराखण केली. ते म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून संपूर्ण राज्यावर लक्ष ठेवून आहेत, तर पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी स्वतः लक्ष देत आहेत. तो अजित दादांचा जिल्हा आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा वहिनी एकाच घरातील असल्याने सुप्रियाताईंना त्यांच्या कामाचा आवाका माहिती आहे. वहिनी खंबीर असून त्यांनी दादांचे धडे घेतले आहेत, त्या अतिशय चांगले काम करत आहेत”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या