अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बहुचर्चित सिस्पे घोटाळ्यातील पसार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. जितेंद्र साहेबसिंग चौधरी (वय 50 रा. पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याला सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सिस्पे घोटाळ्याशी संबंधित दाखल गुन्ह्यांचा एकत्रित तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील पसार संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने स्थानिक गुन्हे शाखेची मदत मागितली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते.
पथक सिस्पे घोटाळ्यातील संशयितांचा शोध घेत असताना जितेंद्र चौधरी याला ताब्यात घेतले. त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. त्याला सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून रविवारी (15 नोव्हेंबर) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, चौधरी हा सिस्पे घोटाळ्यात एजंट म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.




