शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणामुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे डांबराची टंचाई निर्माण होऊन नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या आपल्या वक्तव्याचा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुनरुच्चार केला आहे. विरोधकांकडे अभ्यासाची कमतरता असल्यामुळेच ते या विषयावर राजकीय पोळी भाजत असून रस्त्याच्या विलंबाला जागतिक परिस्थितीच जबाबदार आहे, असा घणाघात त्यांनी केला.
शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या विधानाच्या समर्थनार्थ केंद्र सरकारची अधिकृत आकडेवारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची पत्रे आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचे दाखले देत डॉ. विखे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. भारताला दरवर्षी लागणार्या 90 लाख मेट्रिक टन डांबरापैकी निम्मे डांबर इराक, संयुक्त अरब अमिराती, इराण आणि बहरीन या देशांतून आयात केले जाते. युद्धजन्य परिस्थितीमुळे या आयातीत तब्बल 78 टक्क्यांची घट झाली आहे. परिणामी, फेब्रुवारी 2026 मध्ये प्रति मेट्रिक टन 48 हजार रुपये असलेला डांबराचा दर काही महिन्यांतच 83 हजार 652 रुपयांवर पोहोचला. दरात झालेल्या या 71 टक्के वाढीमुळे महामार्गांच्या कामांवर मोठा परिणाम झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी केलेल्या चौकशीच्या मागण्यांचा समाचार घेताना डॉ. विखे यांनी थेट सवाल केला की, ठेकेदारावर कारवाई करून त्याला कामावरून हटवल्यास उर्वरित रस्त्याचे काम विरोधक स्वतः पूर्ण करून देणार आहेत का? ठेकेदाराला हटवून काम थांबवण्याऐवजी त्याच्याकडून दर्जेदार काम पूर्ण करून घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हात वर केल्यामुळेच पराभूत होऊनही जनतेच्या हितासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे सांगत, जबाबदार नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा आणि रस्ता पूर्ण करून घेण्याचा अधिकार आपल्याला असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, दारू पिणार्यांची संख्या वाढल्याबाबत केलेले विधान हे केवळ उपहासात्मक व मिश्कील शैलीत होते. त्याचा विपर्यास केला गेला असला तरी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास ते विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करत असल्याचे डॉ. विखे यांनी स्पष्ट केले. जागतिक अडचणींनंतरही नगर-मनमाड रस्त्याचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून एका पराभवाने कोणी संपत नाही; 2029 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील निकाल सर्वांसमोर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




