मुंबई । Mumbai
नाशिकचा कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू लागले आहेत. आता हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित राहिले नसून, त्यात अघोरी विद्या आणि उच्चस्तरीय राजकीय षडयंत्राचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विशिष्ट तारखा आणि घटनांचा संदर्भ देत या प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण दिले आहे. मिटकरींच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, यामागे नेमके कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांनुसार, १८, १९ आणि २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत, जेव्हा शिवरात्री आणि अमावास्येचा योग होता, तेव्हा भिगवण रोडवरील सहयोग सोसायटी परिसरात काही संशयास्पद हालचाली झाल्या होत्या. या काळात तिथे अघोरी पूजा करण्यात आल्याचा दावा मिटकरींनी केला आहे. अशोक खरातचा ‘शिवलिका आश्रम’ हा वरकरणी भगवान शंकराच्या पूजेसाठी ओळखला जात असला, तरी तिथे छुप्या पद्धतीने अघोरी विधी चालत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, स्वतःच्या राजकीय लाभासाठी काही विशिष्ट ‘भक्त’ या पूजांमध्ये सहभागी होते, असा थेट आरोप मिटकरींनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात मिटकरींनी ‘VSR’ कनेक्शनचा उल्लेख करत थेट निशाणा साधला आहे. या संज्ञेचा संबंध विलासराव साळुंखे आणि रूपाली चाकणकर यांच्याशी जोडला जात असल्याने चर्चांना उधाण आले आहे. २७ जानेवारीला कारने पुण्याला निघालेले अजित पवार २८ तारखेला अचानक ‘VSR’ विमानाने का गेले, असा सवाल करत मिटकरींनी यामागील अदृश्य हातांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. अजित पवार हे कधीही कर्मकांड मानणारे नेते नव्हते, असे असतानाही त्यांना या अघोरी विधींच्या जाळ्यात ओढण्याचा किंवा त्यांना चुकीचा सल्ला देण्याचा प्रयत्न कोणत्या ‘भक्ता’ने केला, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी गृहखात्याकडे आणि पोलिसांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीतील अशोक खरात आणि आश्रमातील पुजाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) तपासल्यास अजित पवारांच्या विरोधात रचल्या गेलेल्या कथित घातपाताचे सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. “धुके की धोका?” असा सूचक प्रश्न विचारत मिटकरींनी या प्रकरणातील राजकीय सूत्रधार शोधून काढण्याचे आवाहन केले आहे. आता या अघोरी पूजा आणि राजकीय कनेक्शनचा तपास पोलीस कशा प्रकारे करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




