अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यात 5 हजार 375 अंगणवाड्यांपैकी 1 हजार 265 अंगणवाड्यांना स्वतःची इमारती नसल्याने त्या अन्यत्र भरवण्यात येत होत्या. याबाबत ‘सार्वमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. नगरसह राज्यातील अंगणवाड्यांच्या इमारतीची गैरसोय राज्य सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकार पातळीवरून इमारत नसणार्या अंगणवाड्याजवळच्या जिल्हा परिषदेच्या खोल्यांमध्ये भरवण्याचे आदेश राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने काढले आहेत.
यामुळे नगरसह राज्यातील इमारत नसणार्या अंगणवाड्यातील मुलांची सोय होणार आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील 1 हजार 265 अंगणवाड्यांना स्वत: ची इमारत नसून 305 अंगणवाड्या आजही कच्च्या इमारतींमध्ये, 264 ठिकाणी प्राथमिक शाळांमध्ये, 91 ग्रामपंचायत कार्यालयात, 149 समाज मंदिरात आणि 476 अंगणवाड्या भाडोत्री इमारतीत भरवण्यात येत आहेत. नगर जिल्ह्यात अंगणवाडीच्या इमारतीच्या प्रश्नी वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची दखल घेत नव्याने माहितीचे संकलन सुरू केले होते. तसेच आता राज्य सरकारच्या महिला बालकल्याण खात्याने हा विषय गांभिर्याने घेतला असून इमारती नसणार्या अंगणवाड्या आता जवळच्या जिल्हा परिषदेच्या वर्गात भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
2 जुलै रोजी महिला बालकल्याण विभागाने काढलेल्या आदेशात प्रत्येक जिल्ह्यात इमारती नसणार्या अंगणवाड्या या जवळच्या म्हणजेच 1 किलो मीटरच्या आंतरात असणार्या झेडपीच्या शाळांमध्ये भरवण्यात याव्यात. हे करत असतांना संबंधीत शाळांचे व स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडांगण व साहित्य संबंधीत अंगणवाडीला वापरण्या उपलब्ध करून द्यावे, हे करत असतांना संबंधीत शाळेची वर्ग खोलीची सजावट आणि किरकोळ दुरूस्तीला महिला बालकल्याण विभागाने मान्यता दिली असून संबंधीत शाळांचे हस्तांतरण हे तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या मान्यतेने करण्यात यावे, असे महिला बालकल्याण विभज्ञगाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात असणार्या एकूण अंगणवाड्यांपैकी सुमारे 2 हजार ठिकाणी पिण्याचे पाणी व शौचालयाची तर 4 हजारांहून अधिक ठिकाणी वीजेची प्रतिक्षा आहे.
जिल्हास्तरावर सीईओंच्या अध्यक्षतेत समिती
इमारत नसणार्या अंगणवाड्या जवळच्या जिल्हा परिषेदच्या इमारतीमध्ये हलवण्यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर झेडपी सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली समिती राहणार आहे. या समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सदस्य, गट विकास अधिकारी सर्व, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद हे सदस्य राहणार आहेत.





