Wednesday, November 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिया मिर्झाच्या व्हिडीओवरून हायकोर्टानं नेत्यांना फटकारलं; डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे...

दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून हायकोर्टानं नेत्यांना फटकारलं; डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश

मुंबई | Mumbai
मुंबई महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती मोहिमेवरून सुरू झालेल्या वादावर आता मुंबई हायकोर्टाने भाष्य केले आहे. अभिनेत्री दिया मिर्झाने केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सुरू झालेल्या राजकीय वादात आता मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. महापालिकेच्या या कृतीमुळे आपण अस्वस्थ असल्याचे कोर्टाने म्हटले. हटवलेला व्हिडीओ महापालिकेने पुन्हा पोस्ट करावा, असेही कोर्टाने म्हटले. यामुळे नागरिकांचा संविधानावरील विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असेही कोर्टाने सांगितले.

मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ही भूमिका मांडली. मुंबई महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली होती ज्यात दीया मिर्झाने फटाके न फोडता दिवाळी साजरा करा असं आवाहन केले होते. महापालिकेने हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केला. मात्र दीया मिर्झाच्या व्हिडीओवर मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला होता. दीया मिर्झा कायम हिंदूविरोधी भूमिका घेत असून तिने दिवाळी कशी साजरी करायची हे तिने शिकवू नये अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली. त्यानंतर महापालिकेने हा व्हिडीओ हटवला.

- Advertisement -

सांगली जिल्हा बँकेची निवडणुक जिंकताच पडळकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम…

काही व्यक्तींच्या टिप्पणीमुळे सामाजिक सलोखा बिघडू नये
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेने प्रभावी पाऊल उचलले होते. या सार्वजनिक हिताच्या मोहिमेत सहभागी झालेल्या कलाकारांबाबत काही व्यक्तींनी केलेल्या टिप्पण्या न्यायालयाला खटकल्या, असे खंडपीठाने नमूद केले.

‘सार्वजनिक हिताच्या कामात सहभागी झालेल्या कलाकारांबाबत करण्यात आलेल्या टिप्पण्यांमुळे आम्ही अस्वस्थ आहोत. अशा मोहिमेत गटबाजीला जागा असू नये,’ अशा शब्दांत न्यायालयाने आपली भूमिका मांडली. पर्यावरणाचा मुद्दा अन्य कोणत्याही वादासाठी वापरला जाऊ नये. देशातील प्रत्येक नागरिक एकच हवा श्वासात घेतो, असेही न्यायालयाने सुनावले.

न्यायालयाने पुढे म्हटले की, काही व्यक्तींच्या तात्काळ प्रतिक्रियांमुळे समाजाच्या व्यापक हिताला बाधा पोहोचता कामा नये. मुंबई शहराची ओळख एकोपा आणि सर्वसमावेशकतेतून निर्माण झाली आहे. त्यामुळे काही जणांच्या टिप्पण्यांमुळे सामाजिक संतुलन बिघडू देऊ नये.

व्हिडीओ पुन्हा पोस्ट करा
दिया मिर्झाचा हटवलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याबाबतही न्यायालयाने महापालिकेला स्पष्ट सूचना केली. एखाद्या कलाकाराचा सद्भावना संदेश महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवण्यात आला असेल, तर तो पुन्हा प्रसिद्ध करणे योग्य ठरेल, असे न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयानेही सण सर्वांनी मिळून साजरे करण्याच्या भावनेवर भर दिला आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीला एखाद्या सणापासून वेगळे ठेवता येणार नाही, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. ‘कृपया तो व्हिडीओ पुन्हा पोस्ट करा आणि समाजाचा तसेच संविधानावरील विश्वास पुन्हा दृढ करा,’ अशा शब्दांत न्यायालयाने महापालिकेला आवाहन केले.

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Meeting : विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक अन् सहकारी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या...

0
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार दि.०४) रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात...