मुंबई | Mumbai
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (ता. 20 मार्च) चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत सविस्तर भाष्य केले. मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतरही चाकणकरांवर होणारी टीका होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहणी खडसे, शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याच रुपाली ठोंबरे पाटील यांनीही चाकणकरांवर निशाणा साधला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही चाकणकरांवर जोरदार टीका केली असून त्यांचा राजीनामा आधीच यायला हवा होता, रुपाली चाकणकरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
तुम्ही कितीही पळा, पण मी सोडणार नाही
याबाबत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, काल रुपाली चाकणकारांनी राजीनामा दिला. महिला आयोग महिलांच्या न्यायासाठी असतात. पण यांचे अध्यक्ष पद खरात सारख्या माणसाला आधार देण्यात गेले. माझ्याकडे महिलांच्या ५/६ केसेस आल्या आहेत. काल मी सुनील तटकरे यांची बॉडी लैंग्वेज पाहिली ते संतापून पळून गेले. पण तुम्ही किती ही पळणार, मी सोडणार नाही. हे सर्व ओशो जल घ्यायचे. मुख्यमंत्र्यांना आभार तुम्ही महिलांच्या डोक्यावर हात ठेवले, तुम्ही उपकार केले राजीनामा घेऊन असेही अंजली दमानियांनी म्हटले आहे.
रुपाली चाकणकरांची जशा मॉडेलिंगसाठी उभे राहतात, तशी पोझ
पुढे त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्त्री म्हणून गेले 3 दिवस हा सगळा प्रकार घडताना बघत होत्या, पण कोणतेही पाऊल त्यांनी उचलले नाही. महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी अनेक गोष्टी करणे अपेक्षित होते, पण ३ दिवसांनी जेव्हा कळस गाठला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला. पण तो राजीनामा स्वीकारतानासुद्धा जे दिसले ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता आणि रुपाली चाकणकर या तर जशा मॉडेलिंगसाठी उभे राहतात, तशी पोझ देतानाचा फोटो होता. त्यानंतरचे त्यांचे बोलणे ऐकले तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती , एक अहंकार होता. हे सगळे पाहून वाटते की चाकणकरांना खरेच इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे, असे म्हणत दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रकरणात सहभागी असलेल्या बड्या व्यक्तींचे चेहरे समोर आणणार
केवळ राजीनामा पुरेसा नसून, रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी झाली पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षा या संविधानिक पदावर असताना त्यांनी खरातविरुद्धच्या केसेस दाबल्या असतील, तर त्यावर कडक कारवाई व्हायला हवी. अशोक खरातकडे जे जे राजकारणी जात होते आणि त्याचे ‘ओष्णोजल’ (अघोरी तीर्थ) घेत होते, त्या सर्वांची नावे जाहीर झाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. “या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी घाण केली आहे. आता हे राजकारण पूर्णपणे साफ करण्याची वेळ आली आहे,” असे दमानिया यांनी संताप व्यक्त करताना सांगितले. अंजली दमानिया यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व बड्या व्यक्तींचे चेहरे समोर आणण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस टाकाव्या
यावेळी दमानिया यांनी चाकणकर यांनी ‘अनामिका कापल्याचा’ दावा फेटाळून लावत कायदेशीर कारवाईचा जो इशारा दिला आहे त्यावरही भाष्य केले. त्यांना हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस त्यांनी टाकाव्या. आम्हाला काही फरक पडत नाही. सुषमा अंधारे यांनी अनेक फोटो पुराव्यासह दाखवले आहेत, त्यामुळे त्यांनीच याचा सोक्षमोक्ष लावावा. महाराष्ट्रातील महिलांसाठी आणि एका स्त्रीच्या सन्मानासाठी अशा व्यक्तीला पदावरून उचलून फेकून देणे हे माझे कर्तव्य होते आणि ते मी केले आहे, अशी स्पष्ट भूमिका यावेळी दमानिया यांनी मांडली.
Rupali Chakankar: “अशोक खरातला मी गुरु मानलेलं, पण…”; राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण
यापुढे कोणत्याही राजकीय व्यक्तीची नियुक्ती करु नका
दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे आवाहन करत म्हटलं की, यापुढे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्याही राजकीय व्यक्तीची नियुक्ती करू नका. राजकारण आणि महिला आयोग या दोन गोष्टी एकमेकांपासून लांब ठेवाव्यात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. महाराष्ट्रातील महिलांना खरोखर न्याय मिळवून द्यायचा असेल, तर यापुढे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एखादी महिला आयपीएस अधिकारी किंवा निवृत्त न्यायाधीश यांचीच नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
शिर्डी पोलीस स्टेशनमधील केस री-ओपन करण्याची गरज
शिर्डीच्या नावाखाली खरातच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणाऱ्या या सर्व राजकारण्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. विकास दिवटे नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्येची केस शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती, जी नंतर बंद करण्यात आली.ही केस पुन्हा री-ओपन (Reopen) करण्याची गरज असून, त्याबाबत आपण पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना सविस्तर पत्र पाठवणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले.




