बीड | Beed
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्त आज बीडमध्ये सर्वपक्षीय मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता हा मोर्चा बीडच्या डॉ. आंबेडकर चौकातून निघणार असून या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे काही आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील तीन आरोपींबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात फोन आल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. याबाबत मला फोन कॉल आले होते, असे दमानियांनी सांगितले. याची माहिती आपण पोलिसांना दिली असल्याचेही अंजली दमानिया यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
‘काल रात्री मला ११.३० वाजेच्या दरम्यान फोन आला. मला व्हॉट्सअप कॉलवर या सांगितले. फोन लागला नाही. त्यांनी मला व्हॉइस मेल पाठवले. त्याने सांगितले की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लोक कधीच भेटणार नाही. ते मेले. तीन प्रेते सापडली. ती जागाही कॉलवाल्याने सांगितली. हे खरे खोटे मला माहीत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचे मर्डर झाले आहे.’ अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.
दरम्यान यासंदर्भात पोलीसांना माहिती दिल्याचही अंजली दमानियांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलेय. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवालही यावेळी अंजली दमानियांनी उपस्थिती केला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये महामोर्चा निघत आहे. यात मयत संतोष देशमुख यांचे कुटुंब, मनोज जरंगे पाटील, संभाजी राजे छत्रपती, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश धस , राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, विनोद पाटील, यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी काही जणांची चौकशीदेखील केली.
सीआयडी कडून वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी
केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची पत्नी मंजीली कराड व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सीआयडीने शुक्रवारी साडे नऊवाजेपर्यंत चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलेय. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते, त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.