मुंबई | Mumbai
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात (Murder Case) मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर खंडणीसह या प्रकरणात ठपका ठेवल्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून सीआयडी आणि एसआयटी याप्रकरणात तपास करत आहे.
या हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. त्यानंतर वंजारी समाज दमानिया यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. अशातच आता अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषद घेत केला आहे.
यावेळी बोलतांना दमानिया म्हणाल्या की, “मी दोन विधाने केली होती. उच्चपदांवर वंजारी समाजाचे लोक पदावर बीडमध्ये आहेत, असे बोलले होते. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आले आहे. बीडमध्ये (Beed) त्यांना बोलवण्यात आले होते. त्यात कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. समाज कष्टाळू, आळशी आहे, असे मी कुठेही म्हंटले नाही. समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीने सांगण्याचे काम केले गेले. सानप, मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले आणि ते लिहिलं देखील होतं आणि दाखवले होते,” असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत आहे. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत, नरेंद्र सांगळे हा व्यक्ती फोन करत आहेत. मला चार दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी ७०० ते ८०० कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत. अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली असून बाजारु कार्यकर्ते म्हणत ट्वीट करत आहेत. सुनिल फड यांनी देखील तसेच केले असून अत्यंत खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. हे सगळे मुंडे बंधू भगिनी आणि वाल्मिक कराडचे कार्यकर्ते असून फोन करून धमक्या देत आहेत”, असा आरोप त्यांनी केला आहे.
धनंजय आणि पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर
यावेळी बोलतांना अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाचा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून वापर होत आहे. शिक्षक भरतीसंदर्भात याचिका दाखल झाली होती.बिंदू नामावली निभावू,असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्याला स्थगिती दिली आणि हे फॅक्ट आहे. मी पेपरशिवाय बोलत नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट दाखवले.
एसआयटी निष्पक्ष चौकशी करणार?
संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये (SIT) पीएसआय असलेले महेश विघ्ने कसे? बीड जिल्ह्यातील पोलिसांना एसआयटीत घेतले तर ते कसे चौकशी करतील? ही पोलीस वाल्मिक कराडला नमस्कार करणारी माणसं आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी बाहेरील अधिकारी नेमावी अशी मागणी दमानिया यांनी केली. या शासनाचे डोकं ठिकाणांवर आहे का? बीड अधिकारी बीडच्या बॉसची निष्पक्ष चौकशी करणार का? सरकार एसआयटीच्या नावाखाली धुळफेक करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.