Monday, July 15, 2024
Homeनगरअंकुश चत्तर खून प्रकरण : आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात

अंकुश चत्तर खून प्रकरण : आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

अंकुश चत्तर खूनप्रकरणात घटनास्थळी सापडलेले पिस्तूल आरोपींचे नाही तर मयताचे असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला. पोलिसांनी हा दावा खोडत पिस्तूल आरोपींचे आहे, ते कोठून आणले, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाने नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठही जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, सबजेल कारागृहाऐवजी त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

चत्तर खून प्रकरणाच्या आरोपावरून सराईत गुन्हेगार भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे, अक्षय हाके, अभिजीत बुलाख, महेश कुर्‍हे, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे, मिथुन धोत्रे, अरूण पवार व राजू फुलारी यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासी अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक गणेश वारूळे यांनी घटनास्थळी सापडलेले पिस्तूल महेश कुर्‍हे याचे असून, ते कोठून आणले याचा तपास करायचा आहे, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली आणखी एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे, आणखी एका आरोपीचा शोध घ्यायचा असल्याने आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी केली.

आरोपींच्यावतीने अ‍ॅड. महेश तवले व अ‍ॅड. संजय दुशिंग यांनी बाजू मांडली. सदर पिस्तूल आरोपींचे नसून मयताचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, आरोपींना सबजेल कारागृहात ठेऊ नये, असे पत्र कारागृह अधिक्षकांकडून न्यायालयात देण्यात आले. त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्याची मागणी करण्यात आली. आरोपींच्या वकिलांनी येरवडा ऐवजी छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक कारागृहात ठेवण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळत येरवडा कारागृहात आरोपींची रवानगी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या