Thursday, May 14, 2026
HomeनगरKopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील सोनेवाडी येथील संकेत विठ्ठल जाधव या तरुणाचा कोयना बॅकवॉटरमध्ये (Koyna Backwaters) बुडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. होम फर्स्ट फायनान्सचा व्यवस्थापक असलेल्या संकेतच्या मृत्यूने सोनेवाडी गावावर शोककळा पसरली असून सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

संकेत अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील सावेडी (Savedi) शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. उत्कृष्ट कामगिरीमुळे कंपनीने सर्व व्यवस्थापकांसाठी महाबळेश्वर येथे विरंगुळा सहलीचे आयोजन केले होते. 56 मित्रांसह गेलेल्या संकेतने शनिवारी रात्री गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन केले. मात्र रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास वानवली-सोळशी येथील कोयना बॅकवॉटरमध्ये (Koyna Backwaters) अंघोळीसाठी उतरलेल्या संकेतला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात ओढला गेला. सोबत असलेल्या मित्राने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत संकेत दिसेनासा झाला होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले, पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

संकेत केवळ अभ्यासातच नव्हे तर कलेतही निपुण होता. एमबीए पूर्ण केल्यानंतर त्याने संगीत विषयात विशारद पदवी मिळवली होती. येत्या अक्षय तृतीयेला आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो घराचे काम सुरू करणार होता. घराच्या कामामुळे त्याने या सहलीला जाण्यास नकार दिला होता, परंतु त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे वरिष्ठांनी त्याला आग्रहाने सोबत नेले.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल संकपाल, किशोर जावळे आणि नातेवाईकांनी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) धाव घेतली. पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांबळे व सय्यद यांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. सोमवारी सकाळी सोनेवाडी (Sonewadi) अमरधाममध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी आणि दोन भाऊ असा मोठा परिवार असून, एका गुणवंत तरुणाच्या जाण्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या