अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुुरुवारी अहिल्यानगर शहरतील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मौन आंदोलन केले. या परिसराला जंतरमंतर मैदाना असले प्रतिकात्मक नाव देऊन या ठिकाणी हजारे यांच्या विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने सहभागी झाले होते.
हजारे तब्बल आठ वर्षानंतर आंदोलन केले आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर राळेगणसिद्धी येथे मौन आंदोलन केले होते. काही दिवसांपूर्वी माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीमध्ये राज्य सरकारने जाचक बदल केले. याकडे लक्ष वेधत त्या नियमावली मागे घ्याव्यात, या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमावलीला स्थगिती दिल्याने हजारे यांनी आंदोलन स्थगित केले होते. गुुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथून नगरला आगमन झाले. आंदोलनस्थळी आल्यानंतर त्यांनी प्रथम व्यासपीठावर जावून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर मौन आंदोलनास प्रारंभ केला.
यावेळी अनामप्रेम संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. अण्णा हजारे यांच्या चळवळीतील कार्यकर्ते अॅड. श्याम आसावा, अॅड. कारभारी गवळी, दीपक पापडेजा, अॅड. सुरेश लगड, संदीप कुसळकर, सुधीर भद्रे आदींसह विद्यार्थी, तरूण व विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, अशोक मासाळ, विलास पेद्राम आदींनी आंदोलनस्थळी दाखल होत हजारे यांना पाठिंबा दिला. हजारे यांनी मौन आंदोलन सुरू केल्यानंतर काही मिनिटांनी हजारे यांचे डोळे पाणावलेले दिसून आहे. यावेळी त्यांनी डोळ्यावरील चष्मा काढून आपले डोळे दोन ते तीन वेळा पुसले.
दरम्यान दिल्लीतील आंदोलनात घडलेल्या हिंसाचाराच्या आणि पोलिसी कारवाईच्या बातम्या अत्यंत वेदनादायक आहेत. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारच्या घटना घडणे कोणाच्याही हिताचे नाही. कोणत्याही परिस्थितीत हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा अनावश्यक बळाचा वापर टाळला गेला पाहिजे, लोकशाहिमध्ये जनतेचा आवाज दडपून नव्हते, तर त्यांच्याशी संवाद करून प्रश्न सोडवा असे आवाहन हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून केले आहे. देशातील लाखो तरुण पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी आणि इतर अनेक प्रश्नांमुळे अस्वस्थ आहेत.
या अस्वस्थतेकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता, ती समाजातील वेदना आणि अपेक्षा म्हणून समजून घेणे आवश्यक आहे. आपला देश महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या विचारांचा आणि भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचा वारसदार आहे. जनतेचा विश्वास टिकविणे हे कोणत्याही लोकशाही सरकारचे सर्वोच्च कर्तव्य असते. आपण या घटनेची गांभीयनि दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक संवाद साधून लोकशाही मूल्यांना बळकटी द्याल, अशी अपेक्षा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.




