मुंबई | Mumbai
आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. जागतिक भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकेतील वाढते बॉण्ड यील्ड आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळे बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला. सोमवारी (२८ सप्टेंबर) व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स १,१२४.०२ अंकांनी घसरून ७२,७७१.७२ अंकांवर, तर निफ्टी ३६०.२५ अंकांनी घसरून २२,७८०.२५ अंकांवर बंद झाला.
या जोरदार पडझडीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यात जवळपास ८ लाख कोटी रुपयांची घट झाली. बाजारातील एकूण मार्केट कॅप सुमारे ४७४ लाख कोटी रुपयांवर आले.
बाजारात एवढी मोठी घसरण का?
सोमवारच्या घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घटकांचा एकत्रित परिणाम दिसून आला.
अमेरिका-इराण तणावाचा बाजाराला फटका
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने जागतिक बाजारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणकडून युद्धविराम आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा खुले करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला होता; मात्र अमेरिकेने तो स्वीकारला नसल्याने तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली. स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असल्याने त्यावरील कोणताही धोका कच्च्या तेलाच्या किमतींवर थेट परिणाम करू शकतो.
कच्चे तेल १०७ डॉलरच्या आसपास
भू-राजकीय तणावामुळे ब्रेंट क्रूडच्या किमतीत वाढ झाली आणि त्या जवळपास १०७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या. भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असल्याने तेलाच्या किमती वाढल्यास देशाच्या आयात खर्चावर, चलनावर आणि महागाईवर दबाव येण्याची शक्यता असते. यामुळे गुंतवणूकदारांनी तेलावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांतील शेअर्समध्ये विक्री वाढवली.
अमेरिकन बॉण्ड यील्डमध्ये वाढ
अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी यील्डने ५.२ टक्क्यांपेक्षा वर मजल मारली, तर ३० वर्षांच्या बॉण्डचे यील्ड ५.५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले. अमेरिकन बॉण्डमधून तुलनेने आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता वाढल्याने उदयोन्मुख बाजारपेठांमधून परदेशी पैसा बाहेर जाण्याचा दबाव वाढतो. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.
रुपयावरही दबाव
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर यामुळे रुपयावरही दबाव आला. सोमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.९८ या पातळीवर बंद झाला. कमजोर रुपया आणि महाग तेल यामुळे आयात खर्च वाढण्याची चिंता बाजारातील गुंतवणूकदारांना सतावत आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाचे शेअर बाजारवर परिणाम
महाराष्ट्रातील दुष्काळाची चिंता आता केवळ हवामान अंदाजापुरती उरलेली नाही. राज्य सरकारने ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात १ जून ते १८ सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा तब्बल ३०.८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे, अर्थात या नुकसानीचे प्रमाण प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे आहे.
एखाद्या भागात तुरीचे उत्पादन घटले, तर बाजारात डाळीचा पुरवठा कमी होण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे व्यापारी आतापासूनच जास्त दर मोजायला तयार होतात. परिणामी, सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडते. हीच चिंता अनेक पिकांबाबत एकाच वेळी निर्माण झाली, तर अन्नधान्याची महागाई वाढते. शेअर बाजाराला नेमकी याच गोष्टीची भीती वाटत आहे.
सेन्सेक्समधील २९ शेअर्स घसरले
सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २९ शेअर्स लाल निशाणात बंद झाले. एल अँड टी आणि पॉवर ग्रिडमध्ये जवळपास ३ टक्क्यांची घसरण झाली. अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआयमध्येही २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. इन्फोसिस हा सेन्सेक्समधील एकमेव शेअर हिरव्या निशाणात बंद झाला.
सात आठवड्यांपासून बाजारावर दबाव
सोमवारच्या घसरणीची पार्श्वभूमी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नाही. सेन्सेक्स आणि निफ्टीने यापूर्वी सलग सात आठवड्यांची घसरण नोंदवली आहे. या सात आठवड्यांत दोन्ही प्रमुख निर्देशांक जवळपास ६ टक्क्यांनी घसरले असून, या कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १८.५ लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे वृत्त आहे




