पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
पंचवटीतील हिरावाडी परिसरातील महालक्ष्मी नगर येथील ‘समृद्धी ज्वेलर्स या दुकानावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ४ ते ५ अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दुकानातील महिला आणि पुरुषाला पिस्तुलाच्या बटाने बेदम मारहाण करत, सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरावाडीतील समृद्धी ज्वेलर्समध्ये रात्री ९ ते ९:३० च्या सुमारास ४ ते ५ संशयित ग्राहक बनून शिरले. दुकान बंद करण्याची वेळ जवळ आलेली असताना,या तरुणांनी अचानक पिस्तूल आणि इतर शस्त्रांचा धाक दाखवला. त्यांनी दुकानाचे मालक आणि तेथे उपस्थित असलेल्या महिलेला धमकावण्यास सुरुवात केली.
प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता,दरोडेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठला. त्यांनी पिस्तुलाच्या मागच्या भागाने (बट) महिला आणि पुरुषाच्या डोक्यावर व अंगावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मारहाण केल्यानंतर दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू घेत पसार झाले.
दरोडा टाकल्यानंतर सर्व संशयित आरोपींनी दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने मुंबईच्या दिशेने फरार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार,पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दुकानाची पाहणी करून पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेतले आहेत. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके इगतपुरी व मुंबईच्या दिशेने रवाना.शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी कसून शोधमोहीम हाती घेतली आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




