Friday, September 11, 2026
HomeनगरParner Crime News : पारनेर हादरले! सुपा परिसरात सशस्त्र दरोडा, लाखांचा ऐवज...

Parner Crime News : पारनेर हादरले! सुपा परिसरात सशस्त्र दरोडा, लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । तालुका प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, सुपा-शहाजापूर रोडवरील तांगडे वस्तीवर आठ ते नऊ सशस्त्र दरोडेखोरांनी एकाच कुटुंबाला ओलीस धरून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, दरोडेखोरांनी महिलांना मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम बळजबरीने हिसकावून नेली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रावसाहेब मारुती तांगडे (वय ६४, धंदा शेती) हे झरेकर वस्ती (तांगडे वस्ती), सुपा येथे आपली पत्नी संगीता आणि आजारी मुलगी स्वाती यांच्यासह राहतात. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ च्या सुमारास तांगडे कुटुंब जेवण करून हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री १२:३० च्या सुमारास घराबाहेर कुत्री जोरात भुंकू लागल्याने रावसाहेब तांगडे यांना जाग आली. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला असता, अंगणात आठ ते नऊ अनोळखी इसम उभे होते. या सर्वांनी तोंडाला काळे कापड बांधले होते आणि काळ्या रंगाचे जॅकेट व पॅन्ट घातली होती.

दरोडेखोरांनी रावसाहेब तांगडे यांना धमकावून घरात नेले आणि खुर्चीवर बसवले. गोंधळ ऐकून त्यांची पत्नी आणि मुलगी जागे झाले असता, दरोडेखोरांनी हातातील कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. एका दरोडेखोराने संगीता तांगडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र ओढले. कानातील कर्णफुले काढताना त्यांनी प्रतिकार केला असता, चोरट्यांनी त्यांच्या श्रीमुखात लगावून मारहाण केली. अखेर जीवाच्या भीतीने संगीता यांनी स्वतःहून कर्णफुले, नाकातील मोरणी आणि पायातील जोडवे काढून दिले.

या घटनेत दरोडेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठला. मुलगी स्वाती हिच्या हातातील सोन्याची अंगठी निघत नसल्याने चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने ती बळजबरीने कापून काढली. स्वाती हिचेही कर्णफुले आणि सोन्याचे मनीमंगळसूत्र त्यांनी हिसकावून घेतले. रावसाहेब तांगडे यांच्या खिशातील १२ हजार रुपये आणि कपाटातील ८ हजार रुपये अशी एकूण रोख रक्कमही चोरट्यांनी लांबवली.

तांगडे यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांची वृद्ध आई एकटीच राहते. मुख्य घरात लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी तांगडे कुटुंबाचे मोबाईल फोन काढून घेतले आणि त्यांना घरात कोंडून बाहेरून कडी लावली. त्यानंतर त्यांनी आईच्या घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. तिलाही मारहाण करून गळ्यातील सोन्याचे मणी, कर्णफुले आणि कमरेच्या पिशवीतील ८ हजार रुपये लुटले. दरोडेखोर निघून गेल्यानंतर तांगडे यांनी शेजारी बबन झरेकर यांना आवाज देऊन बोलावले आणि आपली सुटका करून घेतली.

या घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी ताफा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत एकूण ९०,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) शिरीष ओमने, स्थानिक गुन्हे शाखेचे किरण कुमार कबाडी यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक व्हॅन, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. सध्या पीएसआय खैरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, कोल्हे, दिवटे, गायकवाड आणि बर्डे हे तपासात सहकार्य करत आहेत. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाची चाहूल; ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरही कोरडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके होरपळून निघत असून राहुरी, श्रीरामपूर,...