Friday, July 3, 2026
HomeUncategorizedकरोनासाठी थर्मल मशीनचा वापर शक्य

करोनासाठी थर्मल मशीनचा वापर शक्य

प्रा.डॉ.पी.एस.लोहार (मो. 8806832020)
(अध्यक्ष, अभ्यास मंडळ उमवि जळगाव)

भारतात करोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी केरळमध्ये आढळला होता.तो चीनमधील हुवान विद्यापीठात शिक्षण घेत होता. भारतात परतल्यानंतर त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर लॉकडाऊन काळात भारताने आज कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला.

- Advertisement -

कोविड-19 कृती दलाच्या प्रमुख डॉ. गिरीधर ग्यानी यांच्या मते भारत तिसर्‍या टप्पा म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशन अथवा सामुदायिक संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे. येत्या 10 दिवसात या संसर्गाची पूर्ण वाढ होऊन विस्फोट होईल. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निदान चाचण्यांची उपलब्धता वेगाने वाढवण्या संदर्भात सातत्याने जोर दिला जात होता.

रॅपिड अँटिबॉडी टेस्ट तपासणीसाठी रॅपिड अँटिबॉडी टेस्ट व रीअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमेरेज चेन रिएक्शन (आरआरटी-पीसीआर) नावाच्या पध्द्ती वापरल्या जातात. रॅपिड टेस्ट ही 10 मिनिटांतच पार पाडली जाते. कुठलाही नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट ती घेऊ शकतो. त्यात कुणी पॉझिटिव्ह आढळल्यास तिचे अलगीकरण करता येते.

त्यानंतर मुख्य चाचण्या (पीसीआर) केल्या जाऊ शकतात.रॅपिड अँटिबॉडी किटच्या माध्यमातून रुग्णांच्या बोटातून रक्ताच्या थेंबाची तपासणी केली जाते. जर रुग्णाच्या शरीरात कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज तयार झाल्या असतील तर त्या किट मधील स्लाईडवर असलेल्या कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर असलेल्या अँटीजेन (प्रथिने) शी जुळून मिश्रणाचा रंग बदलतो याचा अर्थ असा आहे की रुग्ण कोरोना संक्रमित आहे.ही किट द्वारे एचआयव्ही अँटिबॉडी तपासणी व गर्भवती स्त्रियांच्या चाचण्या केल्या जातात.त्यासारखी व मधुमेह तपासणीसाठीचे ग्लुकोमिटर सारखी हाताळण्यास सोपी असतात. त्यासाठी खूप प्रशिक्षणाची किंवा तज्ञांची गरज नसते.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या किटद्वारे करण्यात येणार्‍या तपासण्यांसाठी असलेला आग्रह वाढत होता त्यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च या संस्थेने दिलेल्या आदेशाने चीन मधून आयात केलेल्या 5.5 लाख रॅपिड अँटिबॉडी किट विविध राज्यांना पुरवण्यात आल्या असून, त्याद्वारे तपासण्या सुरू केल्या जात आहेत.परंतु बर्‍याच राज्यांनी या किटद्वारे करण्यात येणार्‍या चाचण्यांच्या अचूकते संदर्भात प्रश्न उपस्थित केले कारण निदान चुकत होते.

सार्वजनिक हित बाजूला ठेवून वैयक्तिक लाभासाठी तयार केलेल्या चीन निर्मित रॅपिड अँटिबॉडी किट परत करण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली तेही अशा वेळी ज्यावेळी त्यांची जास्त गरज होती.वेगवान अँटिबॉडी चाचण्यांपेक्षा आरटी-पीसीआर चाचण्या अधिक अचूक असतात. रुग्णाच्या नाक तसेच घशातील स्वॅब घेऊन करोनाच्या संसर्गाचे निदान योग्य प्रकारे केले जाते.

कोरोना विषाणूचे बाह्यावरण प्रथिनांचे व त्यांचा आत जनुकीय घटक आरएनए व रिव्हर्स ट्रान्सक्रीप्टज नावाचे एंझाईम असते. या चाचणीसाठी आधी आरएनए एक्सट्रक्शन किटचा वापर करून विषाणूंचा आरएनए काढतात.अतिशय कमी प्रमाणात मिळालेल्या आरएनएचे रूपांतर नंतर पॉलिमेरेज चेन रिएक्शन (थर्मोसाइकिलर मशीन) चा वापर करून प्रायमर्स,रिव्हर्सट्रान्सक्रीप्टज एंझाईम न्यूक्लिओटाइडस व बफर च्या मदतीने डीएनए च्या लाखो प्रतित केल्या जाते. शेवटी विशेष जेल व रेडिओएकटिव्ह डीएनएच्या सहाय्याने कोरोना विषाणूचे अचूक पुष्टीकरण केले जाते.

नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेले अमेरिकेतील जीवरसायन शास्त्रज्ञ कॅरी बी. म्युलिस यांनी पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन (पीसीआर) या डीएनए विश्लेषणाच्या तंत्रज्ञान शोधले होते. या संशोधनाचा उपयोग एका डीएनए रेणूच्या लाखो प्रती मिळवण्यासाठी करतात. सन-1984 मध्ये लंडनच्या लिसेस्टर विद्यापीठाचे सर अलेक जेफरी यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून डीएनए फिंगरप्रिंटिंग चा शोध लावला.त्याचा बराच उपयोग गून्हे संशोधनातही होतो.

अगदी 40 हजार वर्षांपूर्वी च्या गोठवलेल्या डीएनएपासून सजीवाची ओळख पटवणारे हे तंत्र आहे.सन-1993 च्या ज्युरासिक पार्क चित्रपटात याच तंत्राने डायनॉसोर जिवंत केल्याची स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी कल्पना रंगवली होती. सध्या कोरोनाचा संसर्ग शोधण्यासाठी सर्वत्र मर्यादित स्वरूपात पीसीआर चाचण्या होत आहेत. कारण त्यासाठी विशेष प्रशिक्षण, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, महागडे पीसीआर व रसायने यांची आवश्यकता असते.

असे असले तरी महाराष्ट्रात प्रगत वैद्यकीय संस्था, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब्स, राष्ट्रीय प्रयोगशाळा येथे अशाप्रकारे चाचणी होत आहे. राज्यातील बहुतेक सर्वच विद्यापीठातील व अग्रेसर महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र तसेच जैवतंत्रज्ञान विभागांत थर्मल सायकलर मशीन उपलब्ध आहेत. त्यांचा वापर जनहिताच्या दृष्टीने कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे अचूक निदान करण्यासाठी होऊ शकतो.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...