Wednesday, April 22, 2026
Homeदेश विदेशArvind Kejriwal : निर्दोष सुटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे थेट पंतप्रधान मोदींना आव्हान;...

Arvind Kejriwal : निर्दोष सुटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे थेट पंतप्रधान मोदींना आव्हान; म्हणाले…

दिल्ली । Delhi

दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

- Advertisement -

“हा निकाल ऐतिहासिक असून सत्याचा विजय झाला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य करत, दिल्लीत पुन्हा निवडणुका घेण्याचे खुले आव्हान दिले. “दिल्लीत निवडणुका घ्या, जर भाजपच्या १० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या, तर मी राजकारण सोडेन,” असा खळबळजनक दावा केजरीवाल यांनी केला.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी रचलेले एक मोठे राजकीय षडयंत्र होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे सर्वात मोठे षडयंत्र असल्याचे सांगत त्यांनी मोदी आणि शाह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.

आम आदमी पार्टीला निवडणुकीच्या मैदानात पराभूत करणे शक्य नसल्यानेच, पक्ष संपवण्यासाठी हे कारस्थान रचले गेले. पक्षाच्या पाच बड्या नेत्यांना तुरुंगात टाकून आणि एका विद्यमान मुख्यमंत्र्याला घरातून फरफटत नेऊन सहा महिने डांबून ठेवण्याचे काम या सरकारने केले, अशी टीका त्यांनी केली.

आपल्या प्रामाणिकपणाबद्दल बोलताना केजरीवाल भावूक झाले. ते म्हणाले, “मी माझ्या संपूर्ण आयुष्यात फक्त प्रामाणिकपणाची कमाई केली आहे. विरोधकांना माझ्या याच इमानदारीवर आघात करायचा होता. जेव्हा कोणी मला बेईमान म्हणते किंवा माझ्या कुटुंबावर आरोप करते, तेव्हा मला खूप वेदना होतात. मी काही केवळ राजकारणी नाही, तर एक सामान्य माणूस आहे. म्हणूनच मी ठरवले होते की, जोपर्यंत मी स्वतःला निष्कलंक सिद्ध करत नाही, तोपर्यंत मी शांत राहीन. आज न्यायालयाने मला निर्दोष ठरवून माझ्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब केले आहे.”

केजरीवाल यांनी दिल्लीच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. गेल्या काही काळापासून दिल्लीतील रस्ते खराब झाले आहेत, रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे आणि मोहल्ला क्लिनिकमधील सुविधांवर परिणाम झाला आहे. शाळांची स्थिती आणि यमुनेच्या प्रदूषणावरूनही त्यांनी चिंता व्यक्त केली. दिल्लीची ही दुरवस्था जाणीवपूर्वक केली गेल्याचा आरोप त्यांनी केला. “तुम्ही सर्व प्रयत्न करून पाहिले, पण आम्हाला रोखू शकला नाहीत. आता अरविंद केजरीवाल यांना थांबवण्याचा तुमच्याकडे एकच मार्ग उरला आहे, तो म्हणजे माझी हत्या करणे,” असे गंभीर विधानही त्यांनी यावेळी केले.

भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना केजरीवाल म्हणाले की, आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता आणि आज तो सार्थ ठरला आहे. ज्या न्यायाधीशांनी आम्हाला न्याय दिला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. ईश्वराचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता, म्हणूनच या अग्निपरीक्षेतून आम्ही सुखरूप बाहेर पडलो आहोत. दिल्लीची जनता आमच्या पाठीशी असून त्यांना आमची इमानदारी माहिती आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नागरिकांच्या सतर्कतेने चोर रंगेहात पकडला; चोप देऊन...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati शहरातील हिरावाडी परिसरातील (Hirawadi Area) शक्तीनगरमध्ये भरदिवसा घरफोडी आणि चोरीचा (Stolen) प्रयत्न करणाऱ्या भुरट्या चोराला नागरिकांनी (Citizen) रंगेहात पकडून पोलिसांच्या...