दिल्ली । Delhi
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. 70 जागांचे निकाल समोर आले आहेत. भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. आपचे दिग्गज नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया तसेच सत्येंद्र जैन यांच्यासह प्रमुख नेत्यांचा पराभव झाला आहे.
निवडणूक निकालानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे अभिनंदन केले आहे. गेले १० वर्ष आम्ही दिल्लीतील जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी काम केले. परंतु या निवडणुकीत जनतेने भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या देण्याचे ठरविले. जनादेश मान्य करून आम्ही प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका निभावू, अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिली आहे. निकालानंतर केजरीवाल यांचा चेहरा पूर्णपणे उतरला होता, आवाजही खोल गेला होता. त्यांच्या देहबोलीतून त्यांच्या मनात असंख्य प्रश्नांचा काहूर माजल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
दिल्लीच्या जनतेने भाजपला बहुमत दिले, त्याबद्दल भाजपचे अभिनंदन. भाजपने लोकांच्या इच्छा आकांक्षांसाठी काम करावे. दिल्लीच्या लोकांनी आम्हाला १० वर्ष बहुमत दिले. आम्ही आरोग्य, शिक्षण, वीज यावर आम्ही प्रभावी काम केले. दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरही आम्ही काम केले. परंतु यावेळी आम्हाला जनतेने विरोधकांची भूमिका सांभाळण्यास सांगितले आहे. आम्ही केवळ विरोधी पक्षांची भूमिका निभावणार नाही तर आम्ही लोकांच्या सुख दु:खात सहभागी होऊ. आम्ही केवळ सत्तेसाठी राजकारणात आलो नाही तर आम्ही सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी, त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी राजकारणात आलो, असे केजरीवाल म्हणाले.
आपच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे निवडणूक लढली. यादरम्यान तुम्हाला खूप काही सोसावे लागले, तरीही तुम्ही मागे हटला नाहीत. भाजपला विजयासाठी शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिली.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर आतिशी यांनी भाजपचे रमेश विधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांचा पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाशी झालेल्या चुरशीच्या लढतीत आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे. आप आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली, त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव करून निवडणूक जिंकली. या जागेवर काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिली होती.