Tuesday, April 14, 2026
Homeमनोरंजनज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई । Mumbai

भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांची प्रकृती सध्या खालावली असून त्यांच्यावर दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ९२ वर्षीय आशाताईंना शनिवारी संध्याकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या एका विशेष पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीत अद्याप अपेक्षित सुधारणा झालेली नाही. भोसले कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेले नसले, तरी त्यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियाद्वारे काही माहिती दिली आहे. “आजीला प्रामुख्याने अशक्तपणा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तिची योग्य काळजी घेतली जात आहे,” असे जनाईने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आशाताईंच्या प्रकृतीची बातमी समजताच देशभरातून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत आपली चिंता व्यक्त केली आहे. “आशा भोसलेजींना रुग्णालयात दाखल केल्याचे ऐकून अत्यंत दुःख झाले. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकीय नेत्यांसोबतच चित्रपट आणि संगीत सृष्टीतील मान्यवरांनीही त्या लवकरात लवकर घरी परताव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे.

आशा भोसले यांनी आपल्या सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत १२,००० हून अधिक गाणी गायली असून त्यांचा चाहता वर्ग जगभरात पसरलेला आहे. दिवंगत गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या भगिनी आहेत. वयाच्या ९० व्या वर्षीही त्यांनी दुबईत लाइव्ह कॉन्सर्ट करून आपल्या ऊर्जेने सर्वांना थक्क केले होते. सध्या संगीत क्षेत्रावर चिंतेचे सावट असून लाखो चाहते आशाताईंच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. रुग्णालयाकडून पुढील माहितीची प्रतीक्षा केली जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १४ एप्रिल २०२६ – भोळी आशा अखेर विफल

0
पाकिस्तान नामक अचानक उदयास आलेल्या नव्या शांततेच्या मसीहाच्या मध्यस्थीनिशी अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादेतील शांतता चर्चेबद्दल फारशी अपेक्षा कोणालाही नव्हतीच; तरीही आखातात दीड महिन्यापेक्षा...