राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
आषाढी वारी म्हणजे श्रीक्षेत्र सराला बेट ते पंढरपूर ही केवळ पदयात्रा, असे काहींना वाटतही असेल. परंतु केवळ वार्षिक नियमित पदयात्रा करणे हा झाला लौकिक किंवा बाह्यांगाचा भाग. वारी म्हणजे सातत्य, निरंतरता, अखंड करावयाची साधना! वारी म्हणजे तपस्या-साधना असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज यांचा पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी अश्वारूढ रथामध्ये योगीराज गंगागिरी महाराज सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या चरण पादुकांची स्थापना करून मंदिर प्रदक्षिणा, बेट प्रदक्षिणा करत महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते चरण पादुकांना गोदा जलाभिषेक व पूजन करत टाळ मृदंगाच्या निनादात ग्यानबा तुकारामच्या जय घोष करत बेटातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
यावेळी महंत रामगिरी महाराज म्हणाले, ध्यानधारणा, योगसाधना, जपतपादी अनुष्ठान, मौनव्रत असे विविध मार्ग तपस्येचे असतात. पंढरीची वारी ही सुद्धा एक तपस्या, साधनाच असून दिसायला सोपी व सुलभ परंतु प्रत्यक्षात आचरण्याला फार कठीण अशी कठोर तपस्याच असते. हे आपण प्रथम नीट समजून घेतले पाहिजे. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांनी 200 वर्षापूर्वी सुरु केलेली परंपरा दिंडी, वारीचा राज्यभर नावलौकिक आहे. वारी म्हणजे फेरा. आपला जन्म-मरणाचा फेरा सुरूच असतो. ती जन्म-मरणाची वारंवार होणारी वारी संपावी, दुःख-क्लेश, यातना, पीडा, भय, शोक, अतृप्ती यांनी डागळलेला मनुष्यजन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा, यासाठीच जी नैष्ठिक पदयात्रा केली जाते तिला वारी म्हणतात. येथे वारी हे साध्य नसून वारी हे एक साधन असते, हे प्रथम लक्षात घ्यावे.
गिरीकंदरात-गुहेत किंवा गंगाकिनारी जाऊन, ऋषिमुनींसारखी वज्रकठोर तपश्चर्या करणे, हे प्रत्येक सर्वसामान्य प्रापंचिकाचे काम नव्हे. हे लक्षात घेऊनच आमच्या दूरदृष्टीच्या संतमहंतांनी नामस्मरण व पंढरीची वारी हा सुलभ व सोपा मार्ग भाविकाला उपलब्ध करून दिला. गेली हजारो वर्षे तरी भाविक मोठ्या श्रद्धेने या सुलभ मार्गाने वाटचाल करताना दिसत असल्याचे महाराजांनी सांगितले. दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेट दिंडी प्रशासकीय मान्यता व मानाची शिस्तप्रिय म्हणून महाराष्ट्रात ओळख असणार्या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले आहे. यावेळी उपस्थित वारकरी भाविकांना संबोधित करताना महाराज म्हणाले, वारी भाविकांच्या जीवनातील दुःख दुर करते. सदगुरु गंगागिरी महाराज वारीला जाताना स्वतःच्या कुटियाला आग लावून निष्काम भावनेने वारी करत.
गोदाधाम बेटाला जोडलेला भाविक हा शेतकरी वारकरी असून यंदा भरपूर पाऊस पडावा व शेतकरी कुटुंब सुखी व समाधानी व्हावे, अशी मागणी पांडुरंगाकडे करणारा असल्याचे महाराज म्हणाले. याप्रसंगी माजी खा. चंद्रकांत खैरै, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गंलाडे, जि. प. माजी सदस्य पंकज ठोंबरे, मनाजी मिसाळ, सुनिल रक्टे, सिताराम भराडे, अमोल मलिक, प्रभाकर बारसे, दत्तू खपके, राम दरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, रामभाऊ महाराज, विक्रम महाराज, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह हजारो वारकरी उपस्थित होते.




