Saturday, April 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भावदिंडी: भाग ११ - असो खेळेमेळे इये जनीं….

आषाढीची भावदिंडी: भाग ११ – असो खेळेमेळे इये जनीं….

नंदन रहाणे

- Advertisement -

स्वच्छतेची आवड हा सद्गुण आहे आणि शरीराची, वस्तूची, घरादाराची व परिसराची स्वच्छता ठेवणे ही एक चांगली सवय आहे. कुठलेही काम करतांना, हातपाय मळतातच, अंगावरचे कपडेही खराब होतातच. त्यासाठी मग तोंड हातपाय धुणे, कपडे भिजत घालून साबण लावणे हे आपण वेळोवेळी करतो. मळणे, डाग पडणे, माखणे हे जितके स्वाभाविक…. तितकेच धुणे, भिजवून आपटणे, घासणे, लख्ख करणे हेही स्वाभाविक! अस्वच्छतेचा जसा आपण बाऊ करीत नाही, तसाच स्वच्छतेच्या आवडीचाही बडीवार माजवीत नाही! ती एक सहजशी नित्यक्रिया आहे व आपल्या रोजच्या जगण्याचा अभिन्न असाच भाग आहे…

म्हणूनच स्वच्छतेला धर्माचाराचा अत्यावश्यक भाग बनवण्यात आले. घरातील वा देवळातील मूर्तीची पूजा म्हणजे तरी काय? आधी वाहिलेली फुले व पत्री गोळा करुन बाजूला काढणे, स्नान किंवा अभिषेक घालणे, मूर्ती पुसून कोरड्या झाल्या की नवी वसने चढविणे आणि शेवटी त्यांच्यावर ताज्या फुलांचे हारतुरे चढविणे हेच की… आता हे काम ज्याने करायचे, त्याने स्वत: आधी आपल्या शरीराची स्वच्छता करणे आलेच!

पण झाले असे की, या सहज स्वाभाविक कृतींचे भलतेच स्तोम माजवण्यात आले. स्वच्छतेतून पावित्र्याचा उद्गम होताच आपोआप… मात्र या पावित्र्याचे ढोल प्रमाणापेक्षा जास्त वाजवले जाऊन, स्वत:कडे श्रेष्ठत्व घेण्याचा धूर्त प्रयत्न पुजारी मंडळींनी केला व त्यातूनच इतरांना कनिष्ठ मानून तुच्छ लेखण्याचा उद्योग सुरु झाला. आधी भेदाची रेेषा आखली गेली, पुढे तिचेच रुपांतर भेगेत केले गेले. हीच भेग रुंदावत नेऊन तिची जाणीवपूर्वक गर्ता बनवली गेली आणि आपल्या पावित्र्याची बेटे स्वतंत्र व सुरक्षित ठेवली गेली.

यासाठी सोवळे अन् ओवळे या दोन कल्पना शोधल्या जाऊन, त्यांचेच अतिरेकी थोतांड माजवले गेले. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहोत, कारण आम्ही देवाचे पुजारी आहोत. आम्ही देवाचे पावित्र्य राखतो. त्यामुळे आम्हीही पवित्रच आहोत. आमचे कपडे, आमची भांडी, आमचा स्वयंपाक हेही सगळे पवित्र… आम्ही सोवळे, तुम्ही ओवळे… चला, दुर हटा, आम्हांला शिवू नका! तुम्ही घाणरेडी कामे करता, तुम्ही अपवित्र आहात! पुढे जाऊन याचेच रुपांतर स्पृश्य व अस्पृश्य या जन्मजात भेदामध्ये केले गेले… वारकरी संप्रदायाने या विषमतेवर निर्णायक प्रहार करण्यात इतिकर्तव्यता मानली. संत सोपानकाकांचा हा
मार्मिक अभंग त्याचाच प्रत्यय देतो –

.पृथ्वी ही सोवळी,
आकाश सोवळे ।
मन हे वोवळे ।
अभक्तांचे ॥1॥
ब्रह्म ते सोवळे,
न देखो वोवळे ।
असो खेळेमेळे । इये जनी ॥2॥
ब्रह्यांड पंढरी सोवळी हे खरी ।
तारिसी निर्धारी ।
एका नामे ॥3॥
सोपान अखंड सोवळा प्रचंड ।
न बोलो वितंड ।
हरिविण ॥4॥

योगीराज निवृत्तिनाथ आणि कविराज ज्ञानेश्वर यांचे धाकटे बंधू हे प्रत्यक्षात मोठे बंडखोर व स्पष्टवक्ते आहेत. ते या सोवळ्याओवळ्याचे स्तोम माजवणार्‍यांवर थेट हल्ला करतात. त्यांची संभावना चक्क ‘अभक्त’ अशी करुन ते ठणकावतात – ही पृथ्वी, हे आकाश सदैव सोवळेच आहे. मात्र, भक्तीचा श्रध्देचा बाजार मांडणारे तुमचे मनच ओवळे म्हणजे अपवित्र आहे. या सृष्टीमागचे चैतन्य जे ब्रह्म, तेही नित्य शुध्दपवित्रच असते. तिथे लेशभरही ओवळेपणा आढळत नाही. मग तुम्ही समाजात भेद का माजवता? लोकांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, खेळीमेळीची भावना राहू द्या ना! त्याचसाठी आम्ही ही समतेची पंढरी उभी केली आहे. तेच आमचे खरे सोवळे ब्रह्यांड आहे, तिथे फक्त एका हरिनामाच्या उच्चाराने प्रत्येक जण तरुन जातो…

मी हा सोपान आहे म्हणजे तुम्हाला उत्तमाकडे, उन्नताकडे, उदात्ताकडे घेऊन जाणारा अखंड व प्रचंड असा पवित्र जिनाच आहे. मी एका नित्यशुध्द, परमपवित्र अशा ईश्वरीय तत्त्वावेगळे भ्रामक, वितंडवाद माजवणारे काहीच सांगणार नाही… या, आपण सारे त्या समतेच्या पांडुरंगाकडे जाऊ या!

ताज्या बातम्या

डंपरची

Nashik News: सी टू भवन समोर भीषण अपघात; डंपरची अनेक गाड्यांना...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधीनवीन नाशिक भागातील खुटवड नगर परिसरातील असलेल्या मधुर स्वीट जवळ एका डंपरने अनेक गाड्यांना धडक दिल्याची भीषण घटना घडली. शनिवारी (दि.१८)...