Thursday, July 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshish Shelar: "तुम्ही भाषा विचारून मारले…"; आशिष शेलारांची मनसेवर सडकून टीका, नेमकं...

Ashish Shelar: “तुम्ही भाषा विचारून मारले…”; आशिष शेलारांची मनसेवर सडकून टीका, नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले होते. यानंतर राज्य सरकारने शालेय शिक्षणातील पहिलीपासून हिंदी सक्ती हा निर्णय मागे घेतला. याच्या विजयी जल्लोष मेळाव्यात तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. हे दृश्य पाहून शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, कालच्या मेळाव्यानंतर आज आता भाजप आमदार आणि मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

कालच्या विजयी मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे, एकत्र राहण्यासाठी, असे विधान केले होते. यावरुन आता आशिष शेलार यांनी देखील प्रत्युत्तर दिले असून त्यांनी मनसेची तुलना थेट पहलागममधील दहशतवाद्यांशी केली आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात पडसाद पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

एकाच भाषण अपूर्ण, एकाचं अप्रासंगिक
दोन भाऊ एकत्र झाले. दोन कुटुंब एकत्र आली याचा आनंद आहे, असे आशिष शेलार म्हणाले. तसेच दोन पक्ष एकत्र येतील की नाही, हे त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. परंतु कालचा कार्यक्रम हा मांडलेला इव्हेंट होता. एकाचे भाषण अपूर्ण, एकाचे अप्रासंगिक भाषण झाले. त्रिभाषा सूत्र कोणी आणले हे त्यांना माहित नाही. देशात कुठे त्रिभाषा सूत्र आहे हे गुगल केले असते तर सत्य समजले असते, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. उद्धव ठाकरेंचे भाषण अप्रासंगिक आणि राज ठाकरेंचे भाषण अपूर्ण होते. उद्धव ठाकरेंच्या मनात सत्ता गेल्याची सल दिसली. ट ला ट आणि फ ला फ लावून भाषण होते. अनाजी पंत म्हणजे काय?, आमच्या कडेही नावे आहेत. टोमणे मारणे ही उद्धव ठाकरेंची पद्धत आहे. दोघांच्या भाषणामध्ये प्रामाणिकपणा नव्हता, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर केला.

पहलगाम हल्ल्याशी तुलना
दोघेही राजकीय भूमिका मांडतायत. मराठीशी त्यांना काही देणेघेणे नाही, असे आशिष शेलार म्हणाले. तुमच्या लेकरांनी तीन भाषा शिकाव्यात, पण इतरांच्या मुलांनी ते शिकू नये का?,दहशतवाद्यांनी जसे पहलगाममध्ये धर्म विचारुन मारले तसे मनसे कार्यकर्त्यांनी भाषा विचारुन मारले असे आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. “पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारुन हिंदूंना गोळ्या मारल्या. इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतायत. दोन्ही गोष्टी उद्विग्न करणाऱ्या आहेत. व्हिडीओ काढा अथवा नका काढू पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....