श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील अवैध जुगार अड्डे आणि दारू व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, आठ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य, वाहने तसेच देशी-विदेशी मद्याच्या बाटल्यांसह एकूण 13 लाख 97 हजार 835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असून, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकात पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्यासह पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमिझराजा आतार आणि विशाल तनपुरे यांचा समावेश होता. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे 28 जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी छापे टाकले.
पहिल्या कारवाईत जुगार अड्ड्यावरून अरुण बोरुडे, दीपक यादव आणि सचिन नवले यांना ताब्यात घेण्यात आले, तर दोन आरोपी फरार झाले. या कारवाईत 1 लाख 45 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसर्या कारवाईत रविंद्र गायकवाड याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका फरार आरोपीचाही त्यात समावेश आहे. या ठिकाणाहून 7 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसर्या कारवाईत गोंधवणी रोड परिसरातील नितेश कंत्रोड याच्याकडून देशी व विदेशी मद्याचा साठा आणि वाहन असा 5 लाख 18 हजार 435 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही कारवायांमध्ये एकूण तीन गुन्हे दाखल, आठ आरोपींविरुद्ध कारवाई आणि जवळपास 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




