शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेला अशोक खरात प्रकरणाचा तपास ‘ईडी’ने सुरू केला आहे. दरम्यान, खरातच्या किशोरवयातील एक अत्यंत संतापजनक कारनामा समोर आला आहे. अवघ्या 18-20 वर्षांचा असताना खरातने जादूटोण्याच्या नावाखाली एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता चर्चेत आली आहे. जुन्या प्रकरणासोबतच आता ईडीची एन्ट्री झाल्याने खरातचे भोंदूगिरीचे साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 1980 च्या सुमारास कोपरगाव तालुक्यात खरातने आपल्याच नात्यातील एका महिलेला जाळ्यात ओढले होते. संबंधित महिलेला अपत्य होत नसल्याचा फायदा घेत त्याने गंडेदोरे आणि पूजा-विधीचा बनाव रचला. विधी केल्यास मुले होतील असे भासवून त्याने त्या महिलेची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केल्याची कुजबुज परिसरात आहे. या प्रकारानंतर गावात प्रचंड संताप व्यक्त झाला होता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गावकर्यांचा रोष पाहून खरातने गावातून पळ काढला आणि तो तब्बल 15 वर्षे गायब होता. हा दीड दशकाचा काळ त्याने कुठे घालवला, कोणाच्या आश्रयाने भोंदूगिरीचे तंत्र आत्मसात केले हे प्रश्न आता पोलीस तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत. 15 वर्षांच्या अज्ञातवासानंतर पुन्हा गावी परतलेल्या खरातने अधिक नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या भोंदूगिरीचे जाळे पसरवण्यास सुरुवात केली होती.
केवळ भोंदूगिरीच नाही तर शिर्डीतील शेतकरी जमीन प्रकरण आणि पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालय सक्रिय झाले आहे. ईडीने आज पोलीस प्रशासनाकडून या सर्व व्यवहारांची माहिती घेतल्याने या प्रकरणाला आता मनी लाँड्रिंगचे वळण लागले आहे. दरम्यान शेतकरी प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींची रवानगी न्यायालयाने कोठडीत केली आहे. 40 वर्षांपूर्वीच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची पोलीस आता खात्री करून घेणार असून खरातच्या जुन्या कांडांचा कच्चाचिठ्ठा बाहेर निघाल्यास त्याच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.




