नाशिक | Nashik
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांचे पुत्र वामन खोसकर (Waman Khoskar) यांनी शिवसेना (शिंदे गट) त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रवींद्र भोये (Ravindra Bhoye) यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) अधीक्षकांकडे लेखी तक्रार देऊन वामन खोसकर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भोये यांनी तक्रार अर्जात नेमकं काय म्हटलंय?
रवींद्र भोये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिक (Nashik) येथील शासकीय विश्रामगृहावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बैठकीत वामन खोसकर यांनी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याची माहिती त्यांना (भोये) मिळाली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा भोये यांनी केला आहे. आमदार पुत्र अधिकृत पदाधिकारी नसताना बैठका घेऊन अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
माझ्या व कुटुंबाच्या जीवाला धोका
रवींद्र भोये यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे की, “या धमकीमुळे माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या (Family) जीवितास धोका निर्माण झाला आहे. भविष्यात माझ्यासोबत काहीही बरे-वाईट घडल्यास त्याला आमदार हिरामण खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर हे दोघेच जबाबदार असतील,” असे त्यांनी म्हटले आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय?
दरम्यान जाब विचारण्यासाठी भोये यांनी वामन खोसकर यांना फोन केला असता, “तू मागील खासदारकीच्या निवडणुकीत माझ्याकडून वाचला आहेस, पण आता वाचणार नाहीस,” अशी भाषा वापरत अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा भोये यांनी केला. या कथीत शिवीगाळ व धमकीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
आमदार खोसकरांनी आरोप फेटाळले
या वादावर माध्यमांशी प्रतिक्रिया देत आमदार हिरामण खोसकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “रवींद्र भोये हे शंभर टक्के खोटे बोलत आहेत. मला कोणत्याही शिवीगाळाबाबत माहिती नाही. वामन हा माझा मुलगा (Son) असल्याने तो माझ्या कार्यालयात येऊ शकतो, पण तो पक्षाचा अधिकृत पदाधिकारी नाही. विनाकारण त्याचे नाव या प्रकरणात ओढले जात आहे,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तर वामन खोसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद येत आहे.




