Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रअमित ठाकरेंनी सुनावल्यानंतर भावेश कावरेनी मागितली मुंबईकरांची माफी; नेमकं प्रकरण काय?

अमित ठाकरेंनी सुनावल्यानंतर भावेश कावरेनी मागितली मुंबईकरांची माफी; नेमकं प्रकरण काय?

मुंबई । Mumbai

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ‘मराठी भाषा’ आणि ‘मांसाहारी विरुद्ध शाकाहारी’ या मुद्द्यांवरून पेटणारा वाद काही नवा नाही. कधी भाषेवरून तर कधी आहाराच्या पसंतीवरून मराठी माणसाला घरे नाकारण्याचे प्रकार शहरात अनेकदा समोर आले आहेत.

- Advertisement -

अशाच एका वादग्रस्त प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. ताडदेव परिसरातील एका आलिशान इमारतीमधील फ्लॅटची जाहिरात करताना “हे घर मांसाहार करणाऱ्यांना मिळणार नाही” असे वक्तव्य करणारा प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे अखेर मनसेच्या आक्रमक पवित्रा आणि वाढत्या दबावानंतर बॅकफूटवर आला आहे.

सोशल मीडियावर जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईकरांमधून आणि विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या वाढत्या वादानंतर भावेश कावरे याने थेट मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज ठाकरे यांची भेट न झाल्यामुळे त्याने मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

अमित ठाकरे यांच्यासोबत झालेल्या या भेटीदरम्यान भावेश कावरेने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे कोणतेही समर्थन न स्वीकारता अमित ठाकरे यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. “ती इमारत पूर्णपणे शाकाहारी लोकांची आहे असे कोण बोलले?” असा थेट सवाल अमित ठाकरे यांनी कावरेला विचारला. त्यावर “नाही, ते विधान फक्त एका विशिष्ट फ्लॅटसाठी होते,” असा युक्तिवाद कावरेने केला.

मात्र, त्याचा हा युक्तिवाद ऐकून अमित ठाकरे संतापले. “मी तो संपूर्ण व्हिडीओ पाहिला आहे. तुला जर निष्कारण वाद घालायचा असेल (Argue करायचे असेल), तर मी येथून निघून जातो,” अशा कडक शब्दांत त्यांनी कावरेची कानउघाडणी केली. पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “तुला या गोष्टींचे गांभीर्य कळले पाहिजे. तुझ्या या कृत्यामुळे तुझ्या कुटुंबीयांना काय वाटले असेल? थोड्याशा पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी तू मुंबईतल्या लोकांमध्ये आणि समाजात अनावश्यक तणाव निर्माण केलास. पैशांपेक्षा सामाजिक सलोखा महत्त्वाचा आहे.” शेवटी, कोणतीही पळवाट न शोधता या प्रकरणी बिनशर्त माफी मागण्याचा स्पष्ट सल्ला अमित ठाकरेंनी त्याला दिला.

मनसेचे उप-शहर प्रमुख योगेश सावंत आणि भांडुप येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत भावेश कावरे हा अमित ठाकरेंच्या भेटीस आला होता. यापूर्वी मनसेने कांजूरमार्ग येथील कावरेच्या कार्यालयावर तीव्र निदर्शने केली होती, तसेच त्याच्यावर पोलीस गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. अमित ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आणि त्यांनी लावलेल्या खडसून बोलण्यानंतर आता भावेश कावरे कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन आपला अधिकृत जबाब नोंदवणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबईसारख्या विविधतेने नटलेल्या शहरात आहाराच्या किंवा भाषेच्या आधारावर भेदभाव निर्माण करणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरत असून, यावर प्रशासकीय व कायदेशीर पातळीवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी आता सर्वसामान्यांतून केली जात आहे.

ताज्या बातम्या