नाशिक (प्रतिनिधी)
नाशिक येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणातील शिर्डी कनेक्शन उघड होत आहे. शिर्डीत कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केल्याचे तसेच स्थानिकांशी त्याचे घनिष्ठ संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरूणीला आक्षेपार्ह फोटो पाठवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्या कार्यालयातील निरज जाधव याने संबंधित तरूणीला खरातसोबतचा एक आक्षेपार्ह फोटो पाठवला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर शिर्डी पोलिसांनी कलम ३५१ (२) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ६६ (३) ६७ (अ) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रकरण पुढील तपासासाठी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, अशोक खरात याचे शिर्डीतील काही व्यावसायिकांशी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे. तसेच अशोक खरात अध्यक्ष असलेल्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशानेश्वर ट्रस्टमध्ये शिर्डी परिसरातील दोन व्यक्ती विश्वस्त म्हणून कार्यरत असल्याची माहितीही समोर आली आहे. अशोक खरात याचे शिर्डीत वारंवार येणे-जाणे असल्याने अनेकांशी त्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. या सर्व प्रकरणाचा सखोल तपास एसआयटीकडून सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि अश्लील व्हिडिओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या खरातची शिर्डी आणि परिसरातील कोट्यवधींची मालमत्ता आता चर्चेचा विषय बनली आहे. निघोज परिसरात तब्बल ५० कोटी रुपये किमतीचा ४ एकरचा भूखंड, त्यानंतर आता आणखी दोन प्राईम लोकेशनवरील भूखंडाबाबत माहिती समोर आल्याने खरातच्या संपत्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील पानमळा भागात जवळपास ३० गुंठ्यांचा प्राईम भूखंड खरातच्या पत्नीच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय निमगाव परिसरात सव्वा एकराचा समायिक भूखंड अशोक खरातच्या नावावर असल्याची माहितीही पुढे आली आहे. याआधी समोर आलेल्या निघोजमधील ४ एकरच्या भूखंडासह विचार केला, तर खरात कुटुंबीयांच्या मालकीची जवळपास २४० गुंठे, म्हणजेच जवळपास ६ एकर जमीन असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ही सर्व जमीन शिर्डी आणि परिसरातील प्राईम लोकेशनमध्ये असल्याने तिची एकूण किंमत ६० ते ७० कोट्यवधींमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. केवळ शिर्डीच नव्हे, तर सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरातही खरातने मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जमवल्याची चर्चा आहे.
शिर्डीच्या तरूणीला ब्लॅकमेल करणाऱ्या नीरजची चौकशी
शिर्डीतील तरूणीला ब्लॅकमेल करणाऱ्या नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला आता नाशिकच्या क्राईम ब्रँच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ केलेल्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात प्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून नीरज जाधवची चौकशी केली जात होती.
सात नेत्यांचे फोटो व्हायरल, ‘त्या’ क्लिप्समध्ये अजून कोणाचे चेहरे ?
महाराष्ट्राच्या राजकारणातील हा ‘एपस्टीन’ प्रकार नेमका कोणाकोणाला अडचणीत आणणार, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. सात नेत्यांचे फोटो तर समोर आले आहेत, पण खरातच्या मोबाईलमधील ‘त्या’ ५६ क्लिप्समध्ये अजून कोणाचे चेहरे आहेत, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




