श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील व्यावसायिक व श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये यांना त्यांच्याच दुकानात मारहाण करण्यात आल्याची घटना भरदुपारी मेनरोडवर घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रीय श्रीराम संघ संस्थापक सागर बेगसह चार अनोळखी हल्लेखोरांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक हनुमानदास उपाध्ये (वय 60) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 28 डिसेंबर 2024 रोजी मी मातोश्री मंगल कार्यालय येथे श्रीरामपूर काँग्रेस कमिटी मार्फत आयोजित आमदार हेमंत ओगले यांच्या कृतज्ञता सोहळ्यात भाषण केले होते. त्यामध्ये येथील सामाजिक व राजकीय परीस्थिती संदर्भात मी माझे मत व्यक्त केले. त्याच्यात मी कोणाचेही नाव घेवून किंवा कोणावरही टीका केली नव्हती.
परंतु काल नेहमीप्रमाणे मी सकाळी 9 वाजता दुकान उघडले, दुकानाचे गिर्हाईक करत असताना दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास चार अनोळखी इसम दुकानावर आले. त्यांनी त्यादिवशी तुम्ही खूप बोलले, भाषणात सागर बेगच्या विरोधात बोलता, तुम्हाला दुकान चालवायचे आहे ना? अशी धमकी दिली. हल्लेखोरांंंपैकी एकाचे फोनवर स्पीकरव्दारे दुकान चालवायचे असेल तर 10 हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच ते सागर बेगच्या विरोधात काही बोलशील तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत होते. त्यापैकी दोघांनी लाकडी दांडक्याने माझ्या डोक्यात तसेच हातावर मारहाण केली, तसेच अन्य दोघांनी मला हाताने ठोसे मारत शिवीगाळ केली.
तसेच आमच्या नादी लागाल तर याद राखा, अशी धमकी देवू लागले. त्यामुळे आजूबाजुच्या दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. तदनंतर या दहशतीमुळे श्रीरामपूर शहरातील दुकाने व्यावसायिकांनी बंद केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(2), 118(1), 115(2), 351(2), 352, 3(5), 351(4), 308(3) प्रमाणे सागर बेग व इतर अनोळखी चार इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे. या घटनेच्या निषेधार्थ काल सर्वपक्षियांच्या वतीने बंद पाळण्यात आला. येथील व्यावसायिकांनी देखील आपले व्यावसाय बंद ठेवून त्यास प्रतिसाद दिला.