नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्राच्या अमरावतीची अवघी १७ वर्षांची कुमकुम मोहोड हिने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये तिरंदाजीच्या महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे. दक्षिण कोरियाच्या ओ येजिन हिच्याविरुद्ध रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात कुमकुमने ५-५ अशी बरोबरी झाल्यानंतर झालेल्या शूट-ऑफमध्ये अचूक १० गुणांचा निशाणा साधत ६-५ असा विजय मिळवला. या कामगिरीसह आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला वैयक्तिक रिकर्व्हमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले.
कुमकुमच्या या विजयामुळे भारताने या प्रकारात तब्बल ४८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. तिच्या या कामगिरीमुळे भारताला २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी महिला वैयक्तिक रिकर्व्हमध्ये कोटाही मिळाला आहे.
३-५ अशी पिछाडी, तरी कुमकुमने सामना फिरवला
सुवर्णपदकासाठी कुमकुमसमोर दक्षिण कोरियाची ओ येजिन होती. अंतिम सामना सुरुवातीपासूनच अटीतटीचा झाला. पहिल्या दोन सेट्सनंतर कुमकुम १-३ अशी पिछाडीवर होती. मात्र, १७ वर्षीय कुमकुमने दबावाखालीही संयम कायम ठेवला. तिने पुढील सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत गुणसंख्या ३-३ अशी बरोबरीत आणली. चौथ्या सेटनंतर ओ येजिनने पुन्हा ५-३ अशी आघाडी घेतली आणि कुमकुमसमोर सामना वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिलेपाचव्या सेटमध्ये मात्र कुमकुमने जबरदस्त कामगिरी केली. तिने ३० पैकी ३० गुण मिळवत सेट आपल्या नावावर केला आणि सामना ५-५ असा बरोबरीत आणला. त्यामुळे सुवर्णपदकाचा निर्णय शूट-ऑफमध्ये झाला.
एका बाणाने ठरला सुवर्णपदकाचा निर्णय!
शूट-ऑफमध्ये दोन्ही खेळाडूंना निर्णायक एक बाण मारायचा होता. ओ येजिनचा बाण ८ गुणांवर लागला. त्यानंतर कुमकुमची पाळी होती. अवघ्या १७ वर्षांच्या या भारतीय खेळाडूने कोणताही दबाव न घेता अचूक निशाणा साधला. तिचा बाण थेट १० गुणांच्या केंद्रावर जाऊन लागला आणि त्याच क्षणी भारताचे सुवर्णपदक निश्चित झाले. कुमकुमने ६-५ असा विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली.
पहिल्याच आशियाई स्पर्धेत तीन पदके
विशेष म्हणजे, कुमकुमची ही पहिलीच आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. पदार्पणातच तिने एक नव्हे तर तीन पदकांची कमाई केली आहे. तिने याआधी महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात अंकिता भकत आणि कीर्ती शर्मा यांच्या साथीने सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर धीरज बोम्मादेवरा याच्यासोबत मिश्र रिकर्व्ह सांघिक प्रकारात तिने रौप्यपदक मिळवले. आता वैयक्तिक रिकर्व्हमध्ये सुवर्णपदक जिंकत तिने स्पर्धेतील तिसरे पदक आपल्या नावावर केले आहे.
महागड्या साहित्याऐवजी मेहनतीवर भर
कुमकुमच्या प्रगतीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तिच्याकडे सुरुवातीपासून अत्याधुनिक आणि महागडे साहित्य नव्हते. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पाच वर्षे जुने सेकंड-हँड धनुष्य वापरल्याचे वृत्त आहे. त्याच साहित्याच्या जोरावर तिने जागतिक स्तरावर आपली छाप पाडली. याच वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करताना वर्ल्ड कप स्पर्धांमध्येही प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली.
भारतीय तिरंदाजीसाठी ऐतिहासिक दिवस
कुमकुमच्या सुवर्णपदकामुळे भारतीय तिरंदाजीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. महिला वैयक्तिक रिकर्व्हमध्ये आशियाई स्पर्धेत भारताला यापूर्वी पदक मिळाले नव्हते; कुमकुमने थेट सुवर्णपदकावर नाव कोरले. याशिवाय तिच्या या विजयामुळे यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची पदकसंख्या आठ झाली असून त्यात पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी कामगिरी केली आहे.




