अहिल्यानगर (प्रतिनिधी)
पाकिस्तानातील कथित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाव्दारे संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी (१० जुलै) अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कारवाई केली. अहिल्यानगर शहर, श्रीरामपूर आणि राहुरी येथे एकाचवेळी धाडसत्र राबवून एकूण १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही तरूणांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली असून त्यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अन्य डिजिटल उपकरणे तपासासाठी जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने मराठवाडा भागातून १५ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांचा समावेश आहे. धाराशिव आणि जालना जिल्ह्यातून दोन आणि बीडमधील एकाचा समावेश आहे.एटीएसने शुक्रवारी राज्यभर विविध शहरांमध्ये एकाचवेळी विशेष तपास मोहीम राबविली. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरूणांशी संपर्क साधून त्यांना आपल्या ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानस्थित गुन्हेगारी नेटवर्कविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. अहिल्यानगर शहरातील दोन, राहुरी तालुक्यातील दोन आणि श्रीरामपूर शहरातील सहा अशा एकूण १० ठिकाणी सकाळी साडेसहाच्या सुमारास एटीएसची विविध पथके पोहोचली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित तरूणांची चौकशी करण्यात आली.
त्यांच्या मोबाईल फोनमधील सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट, संपर्क, डिजिटल व्यवहार आणि अन्य ऑनलाइन हालचालींची तपासणी करण्यात आली. तसेच पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. तपास यंत्रणांकडून विशेषतः पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्याशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘डोगर गँग’शी संबंधित सोशल मीडिया संपांचा मागोवा घेतला जात आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही तरूणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यासंदर्भातील डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून सध्या दुबईतून आपले नेटवर्क चालवत असल्याची माहिती तपास यंत्रणाकडे आहे. सोशल मीडियावर प्रसिध्दी, फॉलोअर्स आणि आर्थिक आमिषांच्या माध्यमातून काही भारतीय तरूण त्याच्या संपर्कात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या माध्यमातून कट्टरतावाद, हेरगिरी तसेच विविध गुन्हेगारी कारवायांसाठी तरूणांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, एटीएसकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य डिजिटल उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून सोशल मीडिया अकाउंट्स, संपर्क आणि डिजिटल व्यवहारांची सखोल पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.




