इगतपुरी | प्रतिनिधी
मागील आठवड्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असुनही कसारा घाटातील महामार्गावरील रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. चार महिन्या पूर्वीच कसारा घाटातील डागडुजीवर मोठा खर्च करण्यात आला होता. मात्र संबधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने आठवड्याभराच्या पावसाने घाटातील रस्त्यावरील संरक्षण भिंत कोसळण्याच्या घटना घडतांना दिसत आहे. या प्रकारामुळे रस्ता सुरक्षेचा वाहन धारकांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मोशी इमारत दुर्घटनेचं ७० तासांनंतरही बचावकार्य सुरुच; इमारतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या कसारा घाटातील जव्हार फाटा येथे ही संरक्षक भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या भेगा पडल्या असून तिथे मोठे खड्डे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे, रस्त्याच्या खालच्या बाजूचा मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेल्याने रस्त्याचा काही भाग हा हवेत लटकल्यासारखा दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला अशी चर्चा वाहन धारक व नागरिंकामध्ये सुरू आहे. पाऊस सुरू असता तर मातीचा हा भराव आणखी खचून मोठी दुर्घटना घडली असती असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने या धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. मात्र केवळ बॅरिकेड्स लावून हे काम थांबणार नसून हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने रस्ता तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली असून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहन धारकांनी केली आहे.




