अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेंडी (ता. नगर) शिवारातील दत्तमंदिर चौक येथे लग्न समारंभासाठी आलेल्या व्यक्तीवर दोन जणांनी लाकडी दांडक्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानासाहेब लक्ष्मण शिंदे (वय 42, रा. शेंडी, ता. नगर) हे त्यांच्या चुलत भावाच्या मुलीच्या लग्नासाठी 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता दत्तमंदिर चौक येथे आले होते. त्याचवेळी संशयित आरोपी बाळू छबुराव भगत आणि सागर भाऊसाहेब कराळे यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. वाद विकोपाला जाताच सागर कराळे याने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी बाळू भगत याने लाकडी दांडक्याने हल्ला केला, त्यामुळे नानासाहेब यांच्या मांडीवर, पाठीवर गंभीर मार लागला. तसेच, संशयित आरोपींनी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
हल्ल्यात नानासाहेब शिंदे जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार आव्हाड करत आहेत.