ॲडलेड । Adelaide
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ चा दुसरा सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान संघ विजयी झाला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १९ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी सहज गाठले.
या सामन्यातील विजयासह कांगारू संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ मध्ये प्रत्येकी एक बरोबरीत सुटला आहे. या आधी पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २३५ धावांनी पराभव केला. तिसरा कसोटी सामना १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा सलग ८ वा विजय आहे.
ॲडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा खेळ संपला. रविवारी, ८ डिसेंबर रोजी टीम इंडियाने ५ विकेट्सवर १२८ धावा करत दुसऱ्या डावाला सुरुवात केली. ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी क्रीजवर होते. निकाल आधीच स्पष्ट दिसत होता पण पंत आणि रेड्डी या निकालासाठी ऑस्ट्रेलियाला दीर्घकाळ वाट पाहतील अशी आशा होती. पण असे होऊ शकले नाही कारण मिचेल स्टार्कने पंतला लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतवले.
दरम्यान या कसोटी पराभवासह भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणातालिकेत आजवरचा मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला असून दोन स्थानांचा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण १४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ९ जिंकले आहेत आणि त्यांची टक्केवारी ६०.७१ आहे.
दुसरीकडे, भारतीय संघाला पराभवाचा फटका सहन करावा लागला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत १६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ९ जिंकले आहेत आणि ६ गमावले आहेत. भारताची टक्केवारी आता ५७.२९ टक्क्यांवर घसरली आहे.