पंढरपूर | Pandharpur
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूर दौऱ्यानंतर परतीच्या प्रवासात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील यात्रा नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर शिंदे मुंबईकडे रवाना होण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले होते. मात्र, हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या बॅटरीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू झाले, मात्र दुसरे इंजिन सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचे उड्डाण रखडले. सुमारे २० ते २५ मिनिटे हेलिपॅडवर प्रतीक्षा केल्यानंतर कोणताही धोका न पत्करता शिंदे यांनी हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.
हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न, पण उड्डाण रखडले
एकनाथ शिंदे हे गुरुवारी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर दौऱ्यावर होते. त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि यात्रेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. दौरा आणि आढावा बैठक पूर्ण झाल्यानंतर शिंदे मुंबईकडे रवाना होण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले. त्यानुसार ते हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र, पायलटने हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे नियोजित उड्डाण होऊ शकले नाही.
Nashik News: मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना; तीन महिने संधी
एक इंजिन सुरू, दुसरे इंजिन सुरू होईना!
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे प्रवास करणार असलेल्या हेलिकॉप्टरला दोन इंजिन होती. हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक इंजिन सुरू झाले; मात्र दुसरे इंजिन सुरू होण्यास अडचण आली. हेलिकॉप्टरच्या बॅटरीची क्षमता कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॅटरी बदलण्याची किंवा पर्यायी बॅटरी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचण दूर होण्यास वेळ लागत असल्याने उड्डाण रखडले.
२० ते २५ मिनिटे हेलिपॅडवर प्रतीक्षा
हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याने घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. शिंदे यांना जवळपास २० ते २५ मिनिटे हेलिपॅडवर थांबावे लागले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी कोणताही धोका न पत्करता पर्यायी प्रवासाचा मार्ग स्वीकारण्याची विनंती केली. तांत्रिक अडचण कायम असल्याने हेलिकॉप्टरने प्रवास करणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका अधिकाऱ्यांनी मांडली.
शिंदेंनी घेतला रस्तेमार्गे जाण्याचा निर्णय
अखेर एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हेलिकॉप्टरने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. ते पंढरपूरहून रस्तेमार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुणे विमानतळावरून पुढील प्रवास विमानाने मुंबईकडे करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे. ऐनवेळी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांच्या प्रवासाच्या नियोजनात बदल करावा लागला.



