Sunday, June 14, 2026
HomeराजकीयEknath Shinde : बच्चू कडूंच्या 'त्या' विधानावर शिंदेंचं सूचक मौन, उदय सामंतांनीही...

Eknath Shinde : बच्चू कडूंच्या ‘त्या’ विधानावर शिंदेंचं सूचक मौन, उदय सामंतांनीही दिली साथ!

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काळातील सत्ता समीकरणांवरून तर्क-वितर्कांना उधाण आले असतानाच, आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

“देवाभाऊंचं (देवेंद्र फडणवीस) प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे,” अशी उघड इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या विधानावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळगलेले सूचक मौन आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिलेली साथ यामुळे आगामी राजकीय गणितांबाबत नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

गेल्या १५ ते २० दिवसांत विदर्भाचा झंझावाती दौरा केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी जनतेचा कौल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने असल्याचा दावा केला. विदर्भात २० पेक्षा जास्त सभा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही. शांत आणि सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदेंनाच आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे. आम्ही स्वबळावर लढणार की नाही, हे अजून ठरले नसले तरी शिंदेंना मुख्यमंत्री करणे हेच आमचे ध्येय आहे. तुम्ही त्यांचे नाव पत्रिकेवर लिहा किंवा नका लिहू, एकनाथ शिंदे हे लोकांच्या मनातील नेते आहेत. त्यांना जेवढे डावलले जाईल, तेवढे ते लोकांच्या मनात घट्ट स्थान निर्माण करतील.”

शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील २० राज्यांच्या राज्यप्रमुखांची बैठक नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा मुख्यमंत्र्यांना बच्चू कडू यांच्या या विधानाबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी यावर थेट भाष्य करणे टाळले. देवेंद्र फडणवीसांचे प्रमोशन आणि आपल्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचारताच, एकनाथ शिंदे यांनी हसत हसत, “बच्चू कडू नेमके काय म्हणाले, याची मी आधी सविस्तर माहिती घेतो आणि त्यानंतरच बोलेन,” अशी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांचे हे हसतमुख मौन बरेच काही सांगून जाणारे आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या या विधानावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी असेल. शेतकऱ्यांच्या बाबत त्यांची मागणी होती. 50 हजार सानुग्रह अनुदान दिलं, त्यांनी 1 लाखांची मागणी केली. मी बच्चू कडू यांच्याशी बोललो आहे. मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी वैयक्तिक आहे. मात्र ही मागणी स्वाभाविक मागणी आहे. माझीही मागणी आहे की, शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. जशी भाजपची मागणी असते देवेंद्र फडणवीस व्हावे, तशीच आमची मागणी असते. बच्चू भाऊंना ज्या सूचना करायच्या होत्या, विनंती करायची होत्या त्या केल्या आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

बच्चू कडू आणि उदय सामंत या दोन्ही बड्या नेत्यांनी जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी बॅटिंग केल्यामुळे महायुतीत आता अंतर्गत खलबते सुरू झाल्याचे दिसते. एकीकडे ‘देवाभाऊंच्या’ प्रमोशनची भाषा आणि दुसरीकडे शिंदे यांच्या नेतृत्वावर दिलेला भर, यावर आता भाजपचे वरिष्ठ नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विदर्भातून सुरू झालेली ही राजकीय ठिणगी आगामी निवडणुकीत काय वळण घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...