Thursday, July 23, 2026
HomeराजकीयBacchu Kadu : शिंदे-उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी, दोन्ही शिवसेना…;...

Bacchu Kadu : शिंदे-उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी, दोन्ही शिवसेना…; बच्चू कडू यांचं मोठं विधान

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा ‘शिवसेना’ हा केंद्रबिंदू ठरत असून, दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच, आमदार बच्चू कडू यांनी एक मोठे विधान करत राजकीय वर्तुळात खळबळजनक वक्तव्य केले आहे. “एकच पक्ष वारंवार का फुटतो, याचे आता संशोधन होणे गरजेचे आहे. परंतु, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल, तर दोन पावले एकनाथ शिंदे यांनी आणि दोन पावले उद्धव ठाकरे यांनी मागे घ्यावीत आणि दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र याव्यात,” असा एक नवा फॉर्म्युला बच्चू कडू यांनी मांडला आहे. शनिवार, २० जून रोजी एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या वैयक्तिक भावना उघडपणे व्यक्त केल्या.

- Advertisement -

आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या मूळ अस्तित्वावर भाष्य करताना म्हटले की, “शिवसेना हे महाराष्ट्रातल्या मातीचे आणि अस्मितेचे संघटन आहे. ही संघटना मजबूत राहणे राज्याच्या हिताचे आहे आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात योग्य ताळमेळ झाला, तर दोन्ही शिवसेनेची एक अजेय ‘वज्रमूठ’ तयार होईल आणि हे पाहायला कोणालाही नक्कीच आवडेल.” त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, “शिवसेना आता पूर्ण ताकदीने आणि मजबुतीने काम करेल. २०२९ हे वर्ष शिवसेनेला मोठी कलाटणी देणारे आणि संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देणारे ठरेल. २०२९ हे पूर्णपणे ‘शिवसेनेचे पर्व’ राहील, यासाठी आम्ही जीवाचे रान करू.”

पक्षांतर्गत फुटाफुटीवर आणि विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर बच्चू कडू यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला. “राजकारण हे नेहमी बेरजेचे असते, ते कधीही वजाबाकीत चालत नाही. एखादा नेता पक्षातून बाहेर पडला म्हणजे तो पैसे घेऊनच फुटला, असा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. आपल्याच जुन्या सहकाऱ्यांवर आणि लोकांवर असा डाग लावणे योग्य नाही,” असे कडू म्हणाले.

यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकांचा दाखला देत विरोधकांना कोंडीत पकडले. “राज्यात तीन ते चार प्रमुख विरोधी पक्ष आहेत. असे असतानाही विधान परिषदेच्या सहा जागा बिनविरोध कशा काय झाल्या? विरोधकांना लढण्यासाठी एक कार्यकर्ताही सापडला नाही का? मग अशा वेळी स्वतःच्या अपयशावर पांघरुण घालण्यासाठी जे पळाले ते पैसे घेऊनच पळाले, असा सरधोपट दोष देणे पूर्णपणे चुकीचे आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

राजकीय घडामोडींसोबतच त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि सामान्य खातेदारांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. जिल्हा बँकेच्या कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले की, “बँकेच्या २९ हजार खातेदारांपैकी तब्बल २८ हजार खातेदारांना या कर्जमाफीचा थेट फायदा होणार आहे. कोणालाच फायदा झाला नाही, हा पसरवला जाणारा दावा साफ खोटा आहे. बँकेचे कर्ज वाटपही पूर्ण झाले असून, आम्ही ९० टक्के कर्ज वाटप यशस्वीरीषा पूर्ण केले आहे.” बच्चू कडू यांच्या या विधानामुळे आता ठाकरे आणि शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया देतो, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘एकजूट’ होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून विवाहितेला त्रास

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका विवाहित महिलेला वारंवार अश्लील मेसेज पाठवत मानसिक छळ केल्याप्रकरणी संबंधित मोबाईलधारकाविरोधात अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा...