मुंबई | Mumbai
लाडकी बहीण योजना म्हणजे नेत्यांच्या खिशातून गेलेले पैसे नाही. सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा तो प्रयत्न होता, अशी टीका प्रहारचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनीही या योजनेवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती,सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. सरकारने मते घेतली मात्र आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणार, ही त्यांची फसवणूक आहे, त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असेही बच्चू कडू म्हणाले.
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले, योजना सुरू केल्यावर कोण पात्र कोण अपात्र याची माहिती न घेता सर्व महिलांच्या खात्यात पैसे वाटले गेले. मात्र आता तुम्ही तपासणी करत आहे की कोणती बहीण योजनेसाठी पात्र आहे, ही चाचपणी योजना सुरू होण्याआधी करायला हवी होती. आत्ता ही तपासणी करून महिलांना पैसे द्यायचं बंद करणे म्हणजे लाडक्या बहिणींची फसवणूक आहे, असे म्हणत कडू यांनी महायुती सरकारला असा सवाल विचारत हा क्राईम आहे, सरकारने गुन्हा केला आहे, असा घणाघाती हल्ला बच्चू कडू यांनी चढवला. सरकारने मते घेतली, मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असेही कडू म्हणाले.
पुण्यातील लाडक्या बहिणींकडील कारची येत्या सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे चारचाकी आढळल्यास, त्यांचे नाव योजनेतून वगळले जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या आढळल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुण्यात ही तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलेकडे चारचाकी गाडी आढळले, तिचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात येईल. ज्यांच्याकडे वाहने असल्याचे निष्पन्न होईल, त्या बहिणींची नावे रद्द करण्यात येणार आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील ३८ बहिणींनी आत्तापर्यंत माघार घेतली आहे. आधी ८ महिलांनी पैसे परत केले होते, त्या पाठोपाठ आता ३० महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा