नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील विविध मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला (Criminal) गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक (Arrested) केली आहे. शुभम उद्धव मगर (वय २०, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे (Suspected) नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि एक बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत होते.
दरम्यान, (दि. ७) हवालदार नाझिमखान पठाण व संदीप भांड यांना मंदिरातील दानपेट्या फोडून चोरलेली नाणी बदलून नोटा घेण्यासाठी एक इसम पंचवटी अमरधामकडून गौरी पटांगणाकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गोदावरी हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला. संशयास्पद रित्या पल्सरवरून येणाऱ्या शुभमला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत सॅगमध्ये चोरीची रोख रक्कम आढळून आली. उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझिमखान पठाण, मिलिंदसिंग परदेशी, मुख्तार शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई (Action) केली.
मित्रांच्या मदतीने मंदिरे लक्ष्य
शुभमची कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे संशयित मित्र प्रणव उर्फ छोट्या जगताप, रितेश सुबर आणि बबुआ अन्सारी (सर्व रा. अशोकनगर, सातपूर) यांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी पंचवटीतील गंगाघाटावरील सांडव्यावरील देवी मंदिर, त्यामागील कालभैरव मंदिर आणि सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागील मंदिराच्या दानपेट्या फोडून चोरी केल्याचे कबूल केले. या कारवाईमुळे पंचवटी आणि गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.




