श्रीरामपूर | Shrirampur
भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि भावनिक महत्त्वही आहे. शेतकर्याच्या जीवनाशी अतूट नाते असलेला बैलपोळा हा त्यापैकीच एक महत्त्वाचा सण. वर्षभर शेतात राबणार्या बैलजोडीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी या दिवशी आपल्या बैलांना सजवतो, त्यांना गोडधोड खाऊ घालतो, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो आणि गावातून मिरवणूक काढतो. मात्र, याच बैलपोळ्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर सुरू झालेला एक वेगळाच ट्रेंड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पूर्वीच्या काळात शेतीची बहुतांश कामे बैलजोडीच्या माध्यमातूनच केली जात. आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने आज ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, विविध यंत्रसामग्री आणि आधुनिक शेतीपद्धतींचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. त्यामुळे बैलजोड्यांची संख्या कमी झाली असली, तरी ग्रामीण भागात आजही बैलपोळ्याच्या दिवशी सजलेल्या बैलजोड्या पाहायला मिळतात. सायंकाळी सजवलेल्या बैलजोड्या मारुती मंदिरासह गावातील प्रमुख ठिकाणांना प्रदक्षिणा घालताना दिसतात आणि हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरते.
मात्र, या पारंपरिक सणाला सोशल मीडियाने आता विनोदाची एक नवी किनार दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सपवर बैलपोळ्याच्या शुभेच्छा देणारे विविध मीम्स मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसतात. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी विवाहित पुरुषांना ‘बायकोचा बैल’ म्हणून संबोधत त्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. काही ठिकाणी तर कार्यालयांमध्येही पुरुष एकमेकांना अशाच शुभेच्छा देताना दिसत असून, त्यातून हास्याचे फवारे उडत आहेत.
विनोद म्हणून एखाद्याला बायकोचा बैल म्हणणे ही आज सोशल मीडियावरील एक गंमत बनली आहे. मात्र, या गंमतीमागील वास्तवाकडे पाहिले तर चित्र काहीसे वेगळे दिसते. घरातील पती हा केवळ पती नसतो; तो आपल्या कुटुंबाच्या जबाबदार्या खांद्यावर घेऊन जगणारा व्यक्ती असतो. मुलांचे शिक्षण, त्यांच्या गरजा, पत्नीची जबाबदारी, आई-वडिलांची काळजी, घरखर्च, कर्जबाजारीपणा, शेती अथवा नोकरीतील अडचणी अशा असंख्य जबाबदार्या पार पाडण्यासाठी तो दिवस-रात्र मेहनत करीत असतो.
शेतातील बैल जसा शेतकर्याच्या संसाराचा आधार होतो, त्याचप्रमाणे आजचा कष्टकरी पुरुष आपल्या कुटुंबाच्या संसाराचा आधार बनून धावताना दिसतो. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या भवितव्यासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी आणि घराचा गाडा सुरळीत चालविण्यासाठी तो सातत्याने कष्ट करतो. म्हणूनच ‘बायकोचा बैल’ हा शब्द विनोदापुरता वापरला जात असला, तरी त्या शब्दामागील कष्टाची बाजूही समाजाने समजून घेण्याची गरज आहे. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलाला आंघोळ घालतो, शिंगांना रंग लावतो, गोंडे-झुलीने सजवतो, त्याला पुरणपोळीचा नैवेद्य देतो.
वर्षभर शेतात राबलेल्या मुक्या प्राण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही सुंदर परंपरा आहे. मात्र त्याच दिवशी कुटुंबासाठी वर्षभर राबणार्या माणसाला बैल म्हणून हिणवले जाते, ही विसंगती विचार करायला लावणारी आहे. बैलाची मेहनत आपण मान्य करतो म्हणून त्याच्यासाठी एक दिवस साजरा करतो. मग आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर कष्ट करणार्या माणसाच्या श्रमांचे मोल किती? त्याच्या त्यागाची दखल कोण घेणार? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
खरे तर बैलपोळ्याचा संदेश केवळ बैलापुरता मर्यादित नाही. तो कष्टाचा सन्मान करण्याचा सण आहे. शेतकर्याच्या जीवनात बैलाचे जे स्थान आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबात आपल्या जबाबदार्या पार पाडणार्या व्यक्तीचे स्थान आहे. म्हणून सोशल मीडियावर ‘बायकोचा बैल’ म्हणून शुभेच्छा देण्याऐवजी, कुटुंबासाठी राबणार्या कष्टकरी पतीला सलाम अशा भावनेने हा दिवस पाहिला तर या सणाचे गांभीर्य आणि सौंदर्य अधिक खुलून दिसेल.
‘तो’ बैल नाही… तो घराचा आधार आहे!
कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छा मनातच दडवणारा, मुलांच्या चेहर्यावरचे हास्य पाहून स्वतःचा थकवा विसरणारा आणि संकट आले की सर्वांत आधी पुढे उभा राहणारा प्रत्येक पुरुष हा बैल नसतो. तो आपल्या घराचा आधार असतो.पोळ्याच्या दिवशी त्याला ‘बायकोचा बैल’ म्हणून हसवणे सोपे आहे; पण त्याने आयुष्यभर उचललेली जबाबदार्यांची ओझी उचलून पाहणे मात्र कठीण आहे.




