अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करणार्या पाच अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत 410 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 6 हजार 500 लिटर कच्चे रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले. या कारवाईत एकूण 3 लाख 63 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 11 जणांविरूध्द पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथके तयार केली. सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकांना अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार शनिवारी (9 सप्टेंबर) पथकाने नेप्ती गावात गावठी हातभट्टी दारू तयार करून तिची विक्री करणार्या व्यक्तींची माहिती घेतली. माहितीच्या आधारे पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.
अजय चांगदेव पवार, शशीकला चांगदेव पवार, सुनील बाजीराव पवार, राजू बाजीराव पवार, दीपक बबन नागपूरे, लहानुबाई छबु पवार, भारत माणिक पवार, मंगल भारत पवार, शरद माणिक पवार, ज्योती भरत पवार आणि कमल माणिक पवार यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




