Wednesday, May 27, 2026
HomeनगरAhilyanagar : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

Ahilyanagar : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

22 ठिकाणी चेकपोस्ट, 5 भरारी पथके तैनात || 2500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मुस्लिम समाजाचा पवित्र बकरी ईद सण उद्या गुरूवारी (28 मे) मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. जिल्हाभरात सुमारे दोन हजार 500 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांचा बंदोबस्त, 22 ठिकाणी चेकपोस्ट, पाच भरारी पथके तसेच वाहतूक नियंत्रणाचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

बकरी ईद काळात कुर्बानीसाठी गोवंश वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गोवंश वाहतुकीवरून कोणताही वाद निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात तब्बल 22 ठिकाणी विशेष चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत असून संशयित वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय, बकरी ईद कालावधीत गोवंश वाहतूक व गोमांस प्रकरणांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पाच विशेष भरारी पथके दिवस-रात्र कार्यरत ठेवली आहेत. ही पथके विविध भागात अचानक तपासणी करत असून संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

तसेच गोवंशी वाहतूक, कत्तलीवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात कुठेही संशयास्पद गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तत्काळ डायल 112 किंवा संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या अन्वये विशेष आदेश जारी करत अहिल्यानगर शहरातील कोठला येथील ईदगाह मैदान परिसरातील वाहतूक नियंत्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. बकरी ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी एकत्र येणार असल्याने वाहतुकीचा ताण वाढण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 28 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत एस.पी.ओ. चौक ते जी.पी.ओ. चौक दरम्यान सर्व प्रकारची चारचाकी व जड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुमारे दोन हजार 500 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी-अंमलदार व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन अप्पर पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपअधीक्षक, 30 पोलीस निरीक्षक, 110 सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) एक कंपनी, दंगल नियंत्रण पोलिसांच्या (आरसीपी) तीन कंपन्या, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या, 10 स्ट्रायकिंग फोर्स असा बंदोबस्त असणार आहे.

ताज्या बातम्या

Rahuri : राहुरीत चार ठिकाणी मावा माफियांवर पोलिसांची कारवाई

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी शहरात अवैधरीत्या मावा व सुगंधी तंबाखू तयार करून विक्री करणार्‍या मावा माफियांवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 3 लाख 49...