Wednesday, January 15, 2025
Homeनगरस्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असल्याने लढाई सुरूच ठेवणार - थोरात

स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असल्याने लढाई सुरूच ठेवणार – थोरात

संगमनेरातील स्नेहसंवाद मेळाव्यातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी साधला संवाद

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मागील 40 वर्ष अविश्रांत काम केले. त्यातून संगमनेर तालुका उभा राहिला. ही परंपरा आपल्याला यापुढेही जपायची आहे. तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होणार आहे. हिंदू-मुस्लीम द्वेष पसरून काहींनी राजकारण केले. मीही हिंदू आहे पण सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. संकटे आली तरी घाबरायचे नाही. स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे. जनता आपल्यासोबत असल्याने आपण लढणार आहोत, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितले.

- Advertisement -

संगमनेरातील यशोधन संपर्क कार्यालयाजवळील मैदानावर झालेल्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधव कानवडे, हिरालाल पगडाल, वसीमभाई आदी मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री थोरात म्हणाले, तालुक्यातील जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले. 40 वर्षे या विभागाचे नेतृत्व करताना अविश्रांत काम केले. मोठ्या कष्टातून तालुका उभा केला. दुष्काळी तालुका ते प्रगतिशील तालुका असा लौकिक देशात पोहोचविला. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला. तालुक्यातील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण केले. कधीही कोणाला त्रास दिला नाही. कधी चुकीचा शब्द बोललो नाही. कुणाचे मन दुखवले नाही.

1985 मध्ये पाण्यासाठी मोठा संघर्ष केला त्यातून 30 टक्के हक्काचे पाणी तालुक्याला मिळाले. 99 मध्ये राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. एकही दिवस वाया न घालवता आदर्श पुनर्वसन करून धरण व कालवे पूर्ण केले. ज्यांनी या कामांमध्ये कोणतेही योगदान दिले नाही ते आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत परंतु काम कोणी केले हे जनतेला माहीत आहे. अजूनही ज्या लोकांना पाणी मिळाले नाही त्यांना पाणी देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. निवडणूक संपली की राजकारण संपले अशी आपली पद्धत आहे. हीच परंपरा आपल्याला जपायची आहे. काही लोकांना तालुक्याचा विकास मोडायचा असून नवीन लोकप्रतिनिधीचा ते हत्यार म्हणून वापर करतील. तालुक्याचे पाणी पळवतील. विकास मोडित काढतील हे आपल्याला होऊ द्यायचे नाही.

आपल्यातील मतभेद मिटवा आणि संघटित होऊन लढा. मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे.संघर्ष आपल्याला नवीन नाही. जनता आपल्याबरोबर असल्याने आपल्याला लढायचे आहे. आपला सहकार चांगला आहे. बाजारपेठ चांगली आहे. शेती समृद्ध झाली आहे. बायपास, हॅपी हायवे, हायटेक बसस्थानक, भव्यदिव्य इमारती आणि निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन असे अनेक मोठमोठे प्रकल्प आपण राबवले आहेत. काम केले त्याबद्दलची कृतज्ञता सर्वांनी ठेवली पाहिजे. 1985 पूर्वी संगमनेर हे दंगलीचे शहर म्हणून ओळखले जायचे. परंतु 40 वर्षे सर्व समाजामध्ये आपण बंधुभाव निर्माण केला. एक आदर्श वातावरण तयार केले.

मीही हिंदू आहे. परंतु इतरांचा कधीही द्वेष केला नाही. मानवता हा धर्म पाळून काम करत आहोत. मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अनेक तीर्थस्थळे उभी केली. परंतु विरोधकांनी काही खोट्या एजन्सी तयार करून खोटे व्हिडिओ टाकून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले. सत्तेचा गैरवापर करून तालुक्यातील आपल्या अनेक कार्यकर्त्यांवर त्यांनी खोट्या केसेस टाकल्या. अनेकांच्या प्रपंचात माती कालवली. हे सर्व थांबवण्यासाठी आपण शिर्डी मतदारसंघात जाऊन लढा दिला. यापुढेही आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन लढायचे आहे, असे ते म्हणाले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत सेवाभावीपणे काम करून तालुका उभा केला. भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी मिळवले. निळवंडे धरण व कालवे निर्माण केले. देशासाठी आदर्शवत सहकार निर्माण केला. गावागावांत विकासाची कामे केली. मंत्रीपदाच्या माध्यमातून संगमनेरचा लौकिक राज्यभर वाढवला. त्यांचे व्यक्तिमत्व आणि काम आपल्या पाठिशी आहे. खोटे-नाटे व्हिडिओ पसरून घाणेरडे राजकारण केले जात आहे. परंतु आपण लढणारी माणसं आहोत. त्यांनी कायम आदर्श मूल्ये जपली. राजकारणातील पावित्र्य जपले. सध्या कार्यकर्ते दुःखी झाले असतील मात्र निराश होणार नाही. येणार्‍या काळामध्ये या संकटावर मात करून पुन्हा राज्याचे नेतृत्व संगमनेर तालुक्याकडे येईल यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

… हा पराभव नाही तर घात : डॉ. तांबे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजकारणातील पावित्र्य जपले. कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. मात्र जातीय तणाव निर्माण करून द्वेष भावना पसरून घाणेरडे राजकारण करणार्‍या मंडळींनी संस्कृत नेतृत्वाचा पराभव नव्हे तर घात केला असल्याची टीका माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या