पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिकरोड येथील जेलरोड परिसरातील (Jail Road Area) लिफ्ट दुर्घटनेची शाई वाळत नाही तोच, शहरात दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. आडगाव परिसरातील (Aadgaon Area) डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये ( Dr. Vasantrao Pawar Medical College) सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विचित्र लिफ्ट अपघातात (Lift Accident) एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. ज्योती शिवाजी आहिरे (५०, रा. मानेनगर, अमृतधाम) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती आहिरे या मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या मजल्यावर साफसफाईचे काम करत होत्या. येथील ऑपरेशन थिएटरमधील साहित्य ने आण करण्यासाठी एका लिफ्टचा (Lift) वापर केला जातो. नियमानुसार या लिफ्टमधून मानवी वाहतूक होत नाही. आज (सोमवारी) काम करत असताना आहिरे यांना लिफ्टचा दरवाजा उघडा दिसला. कुतूहलापोटी त्या लिफ्टच्या मोकळ्या जागेत डोकावून पाहत असतानाच वरच्या मजल्यावरून लिफ्ट खाली आली.
मणका आणि डोक्याला गंभीर दुखापत
वरतून आलेल्या लिफ्टचा तडाखा बसल्याने ज्योती आहिरे यांचे डोके आणि मान लिफ्टमध्ये अडकली. या भीषण दुर्घटनेत त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तदाब (बीपी) मोठ्या प्रमाणावर खालावला आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलाने रुग्णालयाकडे धाव घेतली. घटनास्थळावरील रक्ताचा सडा आणि आईची अवस्था पाहून मुलाने केलेला आक्रोश हृदयद्रावक होता. या गंभीर घटनेनंतर मेडिकल कॉलेज प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. लिफ्टचा दरवाजा उघडा कसा राहिला आणि तांत्रिक बिघाड होता का, याची तपासणी आता केली जात आहे. शहरातील लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





