मुंबई । Mumbai
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत देत या चर्चेला छेद दिला आहे. बारामतीतील कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्यासाठी मोठा आग्रह असून, लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले आहे.
लक्ष्मण हाके यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही कडक शब्दांत टीका केली आहे. लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक ‘अनुकंपा’ तत्वावर का पाहायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “दादांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी शपथविधी होतो, आजोबा आणि नातू अधिवेशनाला निघून जातात, मग त्यांच्या निधनाचे दुःख फक्त आम्हीच का व्यक्त करायचे?” असा बोचरा वार हाके यांनी पवार कुटुंबावर केला आहे. तसेच, सुप्रिया सुळे जर व्यावसायिक (प्रोफेशनल) राजकारण करत असतील, तर आम्हीही तसेच राजकारण करू, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
निवडणूक लढवण्यामागची भूमिका स्पष्ट करताना हाके यांनी ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला. बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बदलण्याचा शासन निर्णय (GR) काढला जाऊ शकतो, ही बाब आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अजित पवार किंवा विद्यमान सरकारने ओबीसींचे कोणतेही प्रश्न मार्गी लावले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असो किंवा वसतिगृहाचा प्रश्न, अनेक विषयांसाठी आम्ही संघर्ष केला, मात्र न्याय मिळाला नाही. ओबीसींचे आरक्षण एका बाजूला संपवले जात असताना या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निवडणूक हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.
लक्ष्मण हाके लवकरच बारामतीचा दौरा करणार असून तेथील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. एका व्यापक बैठकीचे आयोजन करून निवडणूक लढवायची का आणि कोणी लढवायची, यावर शिक्कामोर्तब केले जाईल. हाके यांच्या या भूमिकेमुळे बारामतीमध्ये आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही पोटनिवडणूक राज्यासाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे.




