नाशिक | Nashik
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे (Potholes) नागरिक त्रस्त झाले असून या समस्येवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज नाशिक महानगरपालिकेवर (Nashik NMC) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वाखाली जोरदार ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा महापालिकेवर धडकला, ज्यामध्ये शिवसैनिकांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी शहरातील खड्ड्यांमुळे प्राण गमवावे लागलेल्या सात नागरिकांचे फोटो मोर्चाच्या ठिकाणी लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश परिधान केला होता. “नाशिककरांच्या मृत्यूला मी नाही, तर महापालिका प्रशासन जबाबदार आहे,” असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. तर खड्डे तातडीने न बुजवल्यास सत्ताधारी मंत्री, आमदार आणि नगरसेवकांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला.
हे देखील वाचा : Sanjay Raut : भारताच्या राजकारणात तीन इडियट्स, एक महाराष्ट्रात तर दोन केंद्रात; संजय राऊतांचा घणाघात
खासदार वाजे काय म्हणाले?
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, नाशिक महापालिका हद्दीतील जो खड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणे हीच शिवसेनेची ओळख आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण तो कोणत्या पद्धतीने होतोय हा प्रश्न आहे. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठीच हा मोर्चा काढला आहे. अडीच महिन्यांपूर्वी महापालिकेला पत्र दिले होते त्यावेळी माझ्यावर टीका करण्यात आली. या खड्यांमुळे यापुढे कुणाचेही बळी न जावो यासाठी खड्डे बुजवावे ही मागणी आहे असे त्यांनी सांगितले.
पालक व वाहनचालकांची कसरत
तर आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिला स्कूल व्हॅन चालकाने व्यथा मांडताना सांगितले की, खड्ड्यांमुळे प्रवास अतिशय धोकादायक झाला असून वेळेत शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे. तर शिवसैनिकांनीही नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून प्रशासनावर टीका केली आहे. “खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये रोज एक अपघात होत आहे. हा जामनेरचा जळगावचा खड्डे महाकाल नाशिकमधून पहिले काढला पाहिजे, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल,” असे म्हणत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.




