Friday, May 29, 2026
HomeराजकीयParth Pawar : "धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर…"; पार्थ पवारांच्या...

Parth Pawar : “धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर…”; पार्थ पवारांच्या ‘डाऊनफॉल’ टीकेला काँग्रेसचे सडेतोड उत्तर

मुंबई । Mumbai

- Advertisement -

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने महायुती आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला आता काँग्रेसने अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले असून, थेट अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाताचा मुद्दा उपस्थित करत पार्थ पवारांना खुले आव्हान दिले आहे.

बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असताना काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवला. या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना पार्थ पवार म्हणाले की, “महाराष्ट्रात काँग्रेसचा ‘डाऊनफॉल’ (अधोगती) सुरू आहे. एवढ्या मोठ्या आणि प्रगल्भ पक्षाने असा निर्णय घेणे चुकीचे आहे. लोक दादांवर (अजित पवार) प्रेम करतात आणि अशा वेळी काँग्रेसने घेतलेला हा निर्णय लोकांना आवडणार नाही. याचे परिणाम त्यांना लवकरच महाराष्ट्रात दिसतील.” पार्थ पवारांच्या या वक्तव्याने काँग्रेसच्या गोटात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पार्थ पवारांच्या टीकेचा समाचार घेताना काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “धड भाषणही देता न येणाऱ्या आणि केवळ कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलणे म्हणजे अतिशयोक्ती आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने पार्थ पवारांची खिल्ली उडवली आहे. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी महाशक्तीसमोर शरण गेलेल्या नेत्यांनी काँग्रेसला शहाणपण शिकवू नये, असा टोलाही पक्षाने लगावला आहे.

काँग्रेसने या वादात आता अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाताचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर जमीन घोटाळ्याच्या चौकशीतून वाचण्यासाठी राजकीय सोय पाहणाऱ्या मुलाने कृतघ्नपणा करू नये. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने या अपघाताचा एफआयआर (FIR) नोंदवून न्यायाची प्रक्रिया सुरू केली आहे. जर पार्थ पवारांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी या संशयास्पद अपघाताचा गुन्हा महाराष्ट्रात नोंदवावा. ज्या क्षणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल होईल, त्याच क्षणी काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेईल.”

बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ एका जागेची लढत राहिलेली नसून, ती आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर पोहोचली आहे. पार्थ पवारांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली असली, तरी काँग्रेसने “न्याय आणि तत्त्व” या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. वडिलांच्या मृत्यूच्या चौकशीवरून काँग्रेसने दिलेल्या या आव्हानामुळे आता पार्थ पवार आणि महायुती काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एसआयआर मोहिमेची पूर्व तयारी सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मतदार याद्या अचूक आणि बीएलओंकडून गृहभेटी पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहीम राबवली जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून बारा विधानसभा मतदारसंघांत...