बारामती । Baramati
पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने वैमानिकाचे प्राण वाचले आहेत. या घटनेमुळे बारामती विमानतळ परिसर आणि शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे एक खाजगी अकादमीचे प्रशिक्षण देणारे (Training Aircraft) विमान होते. नियमित सरावासाठी या विमानाने बारामती विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र, आकाशात असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान जमिनीवर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. विमानाचा चक्काचूर झाला असला, तरी वैमानिकाने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचे प्राण वाचले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातामुळे बारामतीकरांच्या मनात २८ जानेवारीच्या त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला २८ जानेवारी रोजी राज्याचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या चार्टर विमानाला याच परिसरात भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता आणि राजकारणातील एका मोठ्या नेतृत्वाला राज्याने गमावले होते.
बारामती परिसरात वारंवार होणाऱ्या विमान अपघातांमुळे आता नागरी विमान वाहतूक सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशिक्षणार्थी विमानांची तांत्रिक तपासणी वेळोवेळी केली जाते का? आणि प्रशिक्षणादरम्यान सुरक्षेचे नेमके कोणते निकष पाळले जातात, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. आजच्या घटनेत जीवितहानी टळली असली, तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विमानतळ परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे सावट आहे. या अपघाताचा नेमका तांत्रिक अहवाल लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.




