अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
एका तरूणाने दुसर्या व्यक्तीच्या नावे फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्यावर तरूणीसह तिच्या भावाचे फोटो पोस्ट करून अश्लिल मेसेज करून त्यांची बदनामी केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपास करत बनावट खाते तयार करणार्या तरुणाला अटक केली आहे. प्रमोद किसन पावसे (रा. इंदापूर जि. पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रमोद पावसे याने फेसबुकवर एका व्यक्तीच्या नावे बनावट खाते तयार केले होते. त्याने फेसबुक, इंस्टाग्राम अशा अॅपवरून अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणीसह तिच्या भावाचे फोटो प्राप्त केले. ते फोटो त्याने फेसबुकवर तयार केलेल्या बनावट खात्यावर टाकले. त्या फोटोबरोबर अश्लिल मेसेज पोस्ट केले. हा प्रकार त्या तरुणीच्या लक्षात येताच त्यांनी 8 जानेवारी 2022 रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी भादंवि कलम 354 (अ), 500 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांनी सुरू केला. तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद पावसे याला इंदापूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
वर्षभरात यांना झाली अटक
येथील सायबर पोलीस ठाण्याकडून सन 2021-22 या वर्षात व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया संदर्भातील गुन्ह्यात नऊ पुरूष, तीन महिला यांना अटक केली आहे. तसेच सहा अल्पवयीन मुले देखील अशा गुन्ह्यात निष्पन्न झाली आहेत. सोशल मीडियावर बदनामी केल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल होत आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
अकाऊंट प्रायव्हसी लॉक असावे
ऑनलाईन क्लासमुळे अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल आले आहेत. त्यांच्याकडून सोशल मिडीयावरील व्हाट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्रामचा वापर करून त्यावर कुटूंबातील व्यक्तींचे फोटो टाकले जातात. त्या फोटोचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यामुळे पालकांनी आपले पाल्य मोबाईलचा काय आणि कसा वापर करतात याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच व्हाट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्रामचे अकाऊंट हे प्रायव्हसी लॉक करावे, अनोळखी व्यक्तीची फे्ंरड रिक्वेस्ट स्विकारू नये, असे आव्हान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांनी केले आहे.





