परळी | Parali
सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या नेत्यांच्या जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बीडधील परळी येथे झालेल्या प्रचार सभेत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. यावेळी ज्या लोकांनी परळीला बदनाम केले त्या लोकांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक आहे. तुमच्या प्रत्येक अडचणी ही माझी अडचण म्हणून मी सोडवली आहे. कोणतीही गडबड करू नका, अशी साद धनंजय मुंडेंनी घातली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जे वातावरण होते, तेच वातावरण आता नगरपरिषद निवडणुकीच्या वेळेला आहे. आज तुम्ही माझ्यासाठी कविता म्हणाले म्हणून मी माझ्या भाषणात शेर म्हणणार नाही. मी माझी जबाबदारी या ठिकाणी नेहमीच बजावली आहे. नगरपरिषदेकडून मला आयटीआय सुरू करायचं आहे. यामुळे रोजगाराला मदत होईल. इथले अतिक्रमण नियमित करून घरकुल देण्याचे काम आपण केले आहे. धनंजय मुंडे नेहमीच तुमच्या कामाला आला आहे. तुम्ही माझ्या दरवाजात काम घेऊन आलात आणि तुम्ही रिकाम्या हाताने परत गेला, असे कधीच झाले नाही. आपले मत वाया जाऊ देऊ नका. नगरपरिषद निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे, असे त्यांनी म्हटले. परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बरकतनगर भागात झालेल्या प्रचार सभेतून ते बोलत होते.
फक्त माझं राजकारणच नाही तर मला संपवायच्या मागे लागले
परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बरकतनगर भागात बोलताना ते म्हणाले, तुमच्या प्रत्येक अडचणी ही माझी अडचण म्हणून मी सोडवली आहे. कोणतीही गडबड करू नका. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, फक्त माझं राजकारणच नाही तर मला देखील संपवायच्या मागे लागले आहेत. पण, अशा वेळेला तुम्ही माझ्यासोबत राहणार की माझी साथ सोडणार? ज्या लोकांनी परळीला बदनाम केले त्या लोकांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक आहे. असे म्हणत मुंडे यांनी परळीत भाननिक साद घातली आहे.
मी माझ्या कातड्याचे जोडे जरी तुम्हाला घातले तरी उपकार फेडू शकत नाही
हे सगळे निवडून आले तर माझी ताकद वाढेल. तुमच्या मनात माझ्याबद्दल असलेले प्रेम माझी ताकद आहे. तुम्ही मला प्रत्येक वेळेला अडचणीत साथ दिली याचे उपकार मी विसरू शकत नाही. मी माझ्या कातड्याचे जोडे जरी तुम्हाला घातले तरी मी तुमचे उपकार फेडू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अल्पसंख्यांक मंत्रालय आहे. याचा आपल्याला विकासासाठी फायदा होईल. लोकसभेला इथून ताईला किती मतं मिळाले याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. रेल्वेमध्ये मी इथली जागा जाऊ दिली नाही, असे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





